अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे.
300 पेक्षा अधिक गावात पाणी टंचाई (WaterCrisisMelghat)
अमरावती जिल्ह्याच्या सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना याची पाण्याची खरी जाणीव आहे. मेळघाटातील अनेक गावात प्यायला घोटभरही पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी अनेक भागात पहाडावरून खाली उतरावे तर काहींना पहाडावर चढावे लागत आहे. मेळघाटातील एकूण 313 गावे येतात. त्यापैकी मोचके गावे सोडले तर इतर गावांमध्ये पाण्याचा दृष्काळ पडला आहे.

जंगलातील विहीरीवरून भरावे लागते पाणी
धारणीतील घटांग या गावापासून चिखलदराकडे जाताना उजव्याबाजूला अडीच किलोमीटर अंतरावर आतमध्ये उंचावर कोहाना हे हजार- बाराशे लोकवस्ती असणारे गाव आहे. या गावातील आदिवासी ग्रामस्थ सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेस गावाच्या खाली चिखलदरा मार्गावरवर सुभाष भूसूम यांच्या शेतात असणाऱ्या विहिरीतून पाणी भरण्याकरिता गर्दी करतात. पाण्यासाठी घरातील लहान मुला-मुलींसह सर्व पाणी भरायला जातात.

चढत्या-उतरच्या कच्च्या मार्गावरून महिलांची पाण्याची ने-आण
गावच्या मुख्य मार्गावरून विहिरीपर्यंत येण्यास फेरा पडतो यामुळे चढ उतार असलेल्या कच्च्या रस्त्यांवरून जंगलात जाऊन पिण्याचे पाणी आणण्याचे काम आदिवासी महिला करत असतात. अशावेळी अनेक आव्हाणांना त्या महिलांना सामोरे जावे लागते. मात्र, यावेळी पाणी वाहून नेतांनाही आदिवासी महिलांची एकता आणि शिस्त दिसून येते.

दुर्गम भागात परिस्थिती गंभीर
जिल्हा प्रशासनाकडून मेळघाटात टंचाईग्रस्त गावात टँकरची व्यवस्था केली जात असली तरी तीस ते चाळीस गावं असे आहेत जिथे टँकरही पोहचू शकत नाही. माडीझडप, माखला, चुनखडी, खडीमल, चौराकुंड, मालूर, खोकमार, भ्रुतृम अशा अनेक गावांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.