मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेल्या सर्वोत्तम संविधानामुळेच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तीला विधानसभा उपाध्यक्षासारखे संवैधानिक पद मिळाले आहे. या संवैधानिक पदाच्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, पीडित कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेन, अशी ग्वाही नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांची बुधवारी विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यानंतर गुरुवारी आपल्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी बनसोडे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत बुद्धवंदना घेतली. यानंतर चैत्यभूमीवरील आंबेडकर ट्रस्टच्या भंतेकडून बनसोडे यांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर बनसोडे यांनी शिवाजी पार्कमधील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनाही अभिवादन केले. यावेळी सिद्धार्थ बनसोडे, तुषार ठाकूर, अमर यादव, तानाजी वडवे आदी उपस्थित होते.
बनसोडे म्हणाले, बुधवारी विधानसभेत माझी विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हे पद मिळू शकले. त्यामुळेच माझ्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीची, कामाची सुरुवात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी चैत्यभूमीवर आलो आहे. महाराष्ट्र विधानसभेला एक मोठी परंपरा आहे. उपाध्यक्षपद हे एक संवैधानिक पद असून, या खुर्चीवरुन सर्वसामान्यांसह गोरगरीब, वंचित, पीडित, महिला, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचे काम करेन, असे सांगितले.
विधानसभेला विरोधी पक्षनेते कधी मिळेल असे विचारले असता बनसोडे म्हणाले, लोकशाहीत राज्य चालवत असताना सत्ताधारी आणि विरोधक हे रथाची दोन्ही चाके असतात असे आपण मानतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता असावा असे माझे मत आहे. खरे तर बुधवारीच राज्याला विरोधी पक्षनेता मिळाला असता पण काही कारणाने होऊ शकले नाही. पण विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे राज्याला लवकरच विरोधी पक्षनेता मिळेल, असा दावाही बनसोडे यांनी केला.