नेत्वा धुरी
मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २२ जून रोजी वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. महालक्षवेधीने ७ जुलै रोजी यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर वनमजूराला अडीच हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली गेली. मंगळवारी ही नुकसानभरपाई दिली गेली. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत उद्यानाच्या विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी-पाटील यांनी ९ जुलै रोजी वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांना गोपनीय अहवाल सादर केला असून, यात नुकसानभरपाईच्या दिरंगाईचे कारण स्पष्ट केलेले नाही. हा अहवाल महालक्षवेधीच्या हाती लागला आहे.
प्रशासनाकडून सीसीटीव्ही देण्यास टाळाटाळ Tiger attack on human in SGNP
सीसीटीव्ही देण्यास उद्यान प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्याला वाचवले जात असल्याची दाट शंका व्यक्त होत आहे. या प्रकरणात वाघावर उपचार करण्याची जबाबदारी असलेल्या पशवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले, व्याघ्र व सिंह विहारचे अधीक्षक निकेत शिंदे तसेच वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांची तपशीलवार अधिकृत भूमिका जाहीर होत नसल्याने या प्रकरणावर संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय ?
२२ जून रोजी उद्यानातील व्याघ्र सफारीतील वाघाच्या पिंजऱ्याजवळ ही घटना घडली. वाघांच्या पिंजऱ्याजवळ पर्यटकांना तसेच सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी आहे. या भागांत वाघांचे पालनपोषण केले जाते. गेल्या महिन्यात रविवारी २२ जून रोजी बाजीराव या वाघावर उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले, प्राणीरक्षक आणि वनमजूर यांच्या उपस्थितीत उपचार सुरु होते. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, उद्यानातील बंदिस्त पिंजऱ्यातील टी-५ या वाघाच्या जखमेवर उपचार सुरु होते. यावेळी उद्यानाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांच्यासह एक प्राणीरक्षक, दोन वनमजूर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र भोईर या प्राणीरक्षकावर वाघाने हल्ला केला. भोईर यांनी डावा हात पिंजऱ्यात टाकून वाघाच्या जखमेवर उपचार सुरु केले. हातातील बाटलीच्या मदतीने हे उपचार सुरु असताना वाघाने अचानक मान फिरवून त्यांचे बोट पकडले. भोईर यांनी क्षणार्धात हात बाहेर काढला, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले.

सिंह आणि व्याघ्र विहाराच्या अधिक्षकांना क्लीन चीट
उद्यानातील सिंह आणि व्याघ्र प्रकल्पाचे अधिक्षक निकेत शिंदे यांना या अहवालातून क्लिन चीट देण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर राजेंद्र भोईर स्वतःहून अधिक्षक निकेत शिंदे यांच्याकडे गेले होते. वनमजूराला प्रत्यक्षात अधिक्षक निकेत शिंदे यांनी रुग्णालयात नेले नाही. भोईर यांना घटनास्थळावरुन तातडीने रुग्णालयात का नेले गेले नाही, तसेच त्यांना वाहनचालकासह रुग्णालयात का पाठवले गेले असाही संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांची पत्नी २२ जून रोजी पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होती. रुग्णालयात पत्नीला भेटायला आलेल्या अधिक्षकांनी राजेंद्र भोईर यांची भेट घेतली होती. मात्र अहवालातील माहितीप्रमाणे रुग्णालयात भोईर यांच्यावर उपचार सुरु असताना अधिक्षकांनी त्यांची भेट घेतली. भोईर यांच्या जखमेची पाहणी केली, विचारपूस केली असे नमूद केल्याने संपूर्ण अहवालातून अधिक्षकांना क्लिन चीट देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
जखमी वनमजूराला अन्नपाणीही विचारले नाही
वनमजूराची सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असताना काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भोईर यांनी गोळीसाठी अधिक्षक निकेत शिंदे यांना गोळीसाठी पाण्याची मागणी केली. यावेळी सोबत असलेले फळ आपण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीसाठी आणले असल्याचे शिंदे यांनी प्राणीरक्षक व वनमजूर राजेंद्र भोईर यांना सांगितले.
ही घटना समजताच उदयानाच्या वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांनी सर्व वनाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत भोईर यांनी स्वतः अधिक्षक निकेत शिंदे यांची वनसंरक्षक व संचालिका अनिता पाटील यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे कमालीच्या संतापलेल्या पाटील यांनी शिंदे यांची सर्वांसमोर कानउघडणी केली.
वनसंरक्षकांकडून झालेल्या अपमानानंतर व्याघ्र व सिंह विहारातील कोणत्याही अधिकाऱ्याने तसेच वनमजूराने थेट वनसंरक्षकांकडे माझ्या परवानगीशिवाय जायचे नाही, असा आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात उद्यान प्रशासनाने अद्यापही अधिकृतरित्या तपशीलवार माहिती दिलेली नाही. तसेच अधिक्षक निकेत शिंदे यांनीही परवानगीशिवाय बोलता येणार नाही, असे स्पष्ट केले.