Tiger attack on human in SGNP; मुंबईत वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात वनमजूर जखमी,

Share

नेत्वा धुरी

मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वनमजूराचा जीव थोडक्यात बचावला असला तरीही वनमजूर आणि प्राणीरक्षकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

नेमकी घटना काय ? Tiger attack on human in SGNP

२२ जून रोजी उद्यानातील व्याघ्र सफारीतील वाघाच्या पिंज-याजवळ ही घटना घडली. वाघांच्या पिंज-याजवळ पर्यटकांना तसेच सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी आहे. या भागांत वाघांचे पालनपोषण केले जाते.  गेल्या महिन्यात २२ जून रोजी रविवारी बाजीराव या वाघावर  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले, प्राणीरक्षक आणि वनमजूर यांच्या उपस्थितीत उपचार सुरु होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव याच्या मानेजवळ जखम झाल्याने त्याला उपचार दिले जात होते. बाजीरावच्या मानेवर औषधाची पावडर टाकण्याची जबाबदारी संबंधित वनमजूराने घेतली. या कामासाठी बाजीरावला दैनंदिन पिंज-यातून वैद्यकीय पिंज-यात हलवण्यात आले. वाघ पाठमोरा अवस्थेत असताना संबंधित वनमजूर त्याच्या मानेजवळील जखमेवर औषधाची पावडर देण्यासाठी प्रयत्नशील होता. अचानक वाघ पाठी फिरला. 

वाघाने वनमजूराची दोन बोटे चावली. घटनेची प्रसंगावधानता लक्षात घेत वनमजूराने क्षणार्धात वाघाच्या जबड्यातून आपला हात सोडवला. या झटापटीत वनमजूराला किरोकळ जखम झाल्याने त्याचा जीव वाचला. 

हा सर्व घटनाक्रम पिंज-याजवळील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला. संबंधित वनमजूराला तातडीने बोरिवली येथील पालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. जखमी वनमजूराला दुस-या वनमजूरानेच उपचारांसाठी नेल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला. त्यामुळे उद्यान प्रशासनाने संबंधित वनमजूराच्या उपचारांसाठी तातडीने हालचाली का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित वनमजूराच्या उजव्या हातावरील दोन बोटांना जखमा झाल्या असून, त्याला इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आले. बाजीराव या वाघावर कोणत्या आजारासाठी उपचार सुरु होते, रागीट स्वभावाच्या या वाघावर बेशुद्ध करुन उपचार का दिले गेले नाहीत, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे, संबंधित वनमजूराला मिळालेल्या नुकसानभरपाईचे स्वरुप तसेच ही घटना पुन्हा होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली जाईल, याबाबतीत उद्यानाच्या वनसंरक्षक आणि संचालक अनिता पाटील यांच्याकडून तपशीलवार माहिती मिळालेली नाही. कामकाजात व्यस्त असल्याने त्यांनी बाजीराव आणि संबंधित वनमजूर व्यवस्थित असल्याची खात्री ‘महालक्षवेधी’ला दिली. याबाबतीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group