The leopard caught in Shahapur died suspiciously शहापूरमध्ये पकडलेला बिबट्या नाशिकमध्ये पोहोचला, उपचारादरम्यान दगावला; वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

This leopard passed away
Share

नेत्वा धुरी
शहापूर : The leopard caught in Shahapur died suspiciously ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळच्या बिबडेवाडी गावात पकडलेल्या एका बिबट्या संशयास्पदरित्या नाशिकमध्ये आढळला. अशक्त बिबट्यावर उपचार सुरु करताच त्यावर अगोदरच उपचार झाल्याचे आढळून आले. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकच्या सीमारेषेवर शहापूर येथून बिबटया सोडणे, बिबट्यावरील उपचार या दोन्ही वादग्रस्त मुद्द्यांमुळे शहापूर प्रादेशिक वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील वनाधिकाऱ्यांना राज्य वनविभागनेच ताशेरे ओढले. या प्रकरणामुळे वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि पशुवैद्यकीय अधिका-यांचा वनाधिका-यांवर आरोप असा वादग्रस्त प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. बिबट्यांच्या उपचारपद्धतींबाबत अद्यापही राज्यात सशक्त वैद्यकीय यंत्रणा नसल्याचा संताप प्राणीप्रेमींनी व्यक्त केला आहे.

नेमके काय घडले? The leopard caught in Shahapur died suspiciously

२५ डिसेंबर २०२२ रोजी शहापूर येथील बिबडेवाडी गावाजवळ एक बिबट्या नागरी वस्तीजवळ आढळल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली. बिबट्या एका ठिकाणी शांत बसलेला असताना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने त्याला पकडून उपचारासाठी उद्यानात नेले. बिबट्यावर सहा दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शहापूरमध्ये सोडलेला बिबट्या काही तासांतच नाशिकमध्ये आढळला. नाशिकमधील वनाधिका-यांनी बिबट्याला अलगद पकडले. उपचारादरम्यान बिबट्यावर अगोदरच उपचार झाल्याचे समजले. अंतर्गत चौकशीअंती हा बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उपचाार घेत होता, बिबट्याला शहापूरमधून पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणल्याचे नाशिक वनविभागातील अधिका-यांना समजले. या घटनाक्रमात बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक परवानगी न घेणे तसेच सीमाभागांत बिबट्या सोडल्याने काही तासांतच बिबट्या नाशिकला पोहोचल्याचा नाशिक वनाधिका-यांनी ठपका ठेवला. या प्रकरणात नागपूर येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातून चौकशीचे आदेश देण्यात आले.

दरम्यानच्या काळात नाशिकमध्ये सापडलेल्या बिबट्याला पुणे येथे रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारांसाठी रवाना करण्यात आले. बिबट्या उपचारांसाठी दाखल होताना अशक्त आढळून आल्याने चौकशी समितीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील उपचारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चौकशी समितीच्या अधिका-यांनी नाशिकमध्ये बिबट्या आढळून येईपर्यंत संपूर्ण घटनाक्रम तपासला. बिबट्याला शहापूर येथेच पुन्हा सोडण्यात आले होते. मात्र काही तासांतच हा बिबट्या नाशिकमध्ये पोहोचला. बिबट्या नाशिक येथील सीमाभागांत सोडल्याचा सुगावा लागताच नाशिक येथील वनाधिका-यांनी या प्रकरणाची सगळी पोलखोल नागपूर येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयात केली. विनापरवाना बिबट्या पकडणे, अशक्त बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडणे असा ठपका चौकशी समितीच्या अंतिम अहवालात नमूद करण्यात आला.

चौकशी समिती आणि धक्कादायक निष्कर्ष

तत्कालीन शहापूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांनी बिबट्या गावाजवळ आल्याने त्याला पकडण्यासाठी परवानगी घेण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यांनी या प्रकरणी लेखी माफीनामा सादर करत भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, असे आश्वासन दिले.

याबाबत माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहिप गुप्ता म्हणाले, ” तत्कालीन शहापूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांनी लेखी माफिनामा सादर केला. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचार दिले गेले होते, अशक्त बिबट्याला कोणत्या आधारावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले गेले, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. त्यानंतर आम्ही ही केस बंद केली.”

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा वनविभागावर आरोप

या प्रकरणात तत्कालीन कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डॉ. निखिल बनगर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “बिबट्याला पकडल्यावर लगेच वैद्यकीय तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेतले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या रक्ताचे नमुने परळ येथील खासगी लॅबमध्ये पाठवले जातात आणि त्यांच्या अहवालानुसारच बिबट्यावर उपचार सुरू झाले.”

डॉ. बनगर यांच्या मते, “सर्व नियमांचे पालन करून आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बिबट्यावर उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती आणि तो योग्य मांसाहारही करत होता. बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी योग्य होता. परंतु, त्यावेळेच्या ठाणे प्रादेशिक वनविभागाच्या ठाणे शहरातील उपवनसंरक्षकांनी आणि त्यांच्या नजीकच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला निसर्गात मुक्त करण्याचा निर्णय घेतला.” त्यांनी पुढे नमूद केले की, “या प्रकरणात प्राण्याला सांभाळणाऱ्या केअरटेकरचा अहवालही महत्त्वाचा ठरतो.”

या प्रकरणामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीतील गंभीर उणीवा आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक पारदर्शक आणि जबाबदार कार्यप्रणालीची गरज आहे, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group