पाकिस्तानमध्ये घूसून दहशतवादी मुख्यालये केली उध्वस्त; भारत-पाक दरम्यान युध्दाचे ढग दाटले
मुंबई : (Strike in Pakistan) बुधवारी पहाटेच्या वेळी पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी लक्ष्यभेद करत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याचे उत्तर भारताने दिले आहे. या हल्यात जैश ऐ मोहम्मद, लष्कर ऐ तोयबाचे मुख्यालय टार्गेट केले गेले. सकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेवून या संदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली. हा हल्ला नेमका क्षेपणास्त्राने केला की हवाई दलाने केला या संदर्भात अजूनही स्पष्ट झाले नाही.या हल्याचा तपशिल माहिती हळूहळू समोर येत आहे.
पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर स्ट्राईक (Strike in Pakistan)
22 एप्रिलला काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत दहशवादी हल्यामध्ये 29 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तब्बल 15 दिवसानंतर भारताने हे प्रत्युत्तर दिले आहे.मात्र भारताच्या या हल्लाला सडेतोड उत्तर दिले जाईल, त्याची वेळ आणि स्थळ आम्ही ठरवू अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे. त्यामुळे येत्या पुढील दिवसामध्ये भारत-पाकमधील युध्दजन्य परिस्थिती अधिक चिघळण्याचे संकेत आहे.

सात मे रोजी मध्यरात्री एक ते दिड दरम्यान भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले.केवळ 30 मिनीटात पाकव्याप्त काश्मीर तसेच पंजाब प्रांतातील 9 ठिकाणे टार्गेट करण्यात आली.ही सर्व ठिकाणे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते, पहलगाम हल्याचा कट या ठिकाणी शिजल्याचे भारतीय लष्कराच्या प्रवक्तांनी सांगीतले आहे. आम्ही अत्यंत व्यावसायिक पध्दतीने दहशतवादी केंद्रावर हल्ले केले आहे. या दरम्यान लष्करी किंवा नागरी भागावर हल्ला केलेला नाही असेही लष्कराने स्पष्ट केले आहे.
भारत-पाकिस्तान युध्दाचे ढग
दरम्यान भारताच्या हल्यानंतर पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली आहे. पाकिस्तान लष्कराने भारताचे पाच लढाऊ विमान पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. या सोबत भारताने चिनाब नदीवरील विद्युत प्रकल्पावर हल्ला केला. जेव्हा भारताचा हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानच्या हवाई सिमेत 50 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करत होती, त्यामुळे भारताची ही कृती युध्दाची कृती असल्याचा आरोप पाकिस्तानने केली आहे. ज्या ठिकाणी हल्ले झाले त्या ठिकाणावर 50 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रकारांना घेवून जाणार असल्याचे पाकिस्तान प्रशासनाने सांगीतले आहे.या हल्लानंतर पाकिस्तानने देशात रेड अलर्ट घोषित केला असून शाळा, कॉलेजला सुट्टी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय पडसाद
भारताच्या या हल्यावरुन आंतरराष्ट्रीय प्रतिक्रीया उमटत आहे. चिनने नेहमीप्रमाणे भारताच्या हल्लाचा निषेध केला आहे.तुर्की देखील पाकिस्तानच्या समर्थनार्थ धावून आला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या विनंती केली आहे. परराष्ट्र सचिव मार्क रुबीयो यांनी दोन्ही राष्ट्राच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बोलणे केले असून , अमेरिका दोन्ही देशामधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगीतले आहे. फ्रान्सने दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
या ठिकाणी झाले हल्ले
- मुजफ्फराबाद
- बाग
- गुलपूल
- भिमबर
- सियालकोट
- चकामृत
- कोटली
- मुरीदके
- बहावलपूर