नेत्वा धुरी
मुंबई : Sale of Ivory Items Surges in Mumbai सध्या मुंबईत हस्तिदंतापासून बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामध्ये हस्तिदंताच्या काठ्या आणि सजावटीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी वन विभागाने जुलै महिन्यात मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून या वस्तू हस्तगत केल्या आहेत. या वस्तू खरोखरच हस्तिदंताच्या आहेत की नाही, याचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
हस्तिदंतापासून बनलेली काठी ताब्यात Sale of Ivory Items Surges in Mumbai

१ जुलै रोजी मुंबई प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे घाटकोपर येथून दोन संशयितांकडून हस्तिदंतासारखी दिसणारी एक काठी जप्त केली. नालासोपारा आणि अंधेरी येथे राहणाऱ्या गोविंद पोटखुरे आणि सैफुद्दीन शेख या दोघांकडून ही काठी ताब्यात घेण्यात आली. ही काठी खरोखरच हस्तिदंतापासून बनवलेली आहे का, याचा प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप या विक्रेत्यांना अटक करण्यात आलेली नाही.

१६ जुलै रोजी दक्षिण मुंबईतील मटन स्ट्रीट येथील मॉडर्न आर्ट गॅलरीजवळील एका दुकानातून वन अधिकाऱ्यांनी अनेक हस्तिदंतसदृश वस्तू ताब्यात घेतल्या. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (Wildlife Crime Control Bureau) आणि मुंबई प्रादेशिक वनविभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या छाप्यात गणपती मूर्तींसह विविध प्रकारच्या घरगुती सजावटीच्या वस्तू आढळल्या. या धडक कारवाईत निजामुद्दीन मोहम्मद इक्बाल मन्सूरी, मोहिनुद्दीन मोहम्मद इक्बाल मन्सूरी आणि अकिब मोहम्मद अनीस खान या आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या सुधारित नियमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या सर्व वस्तू नागपूर येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
वन विभागाच्या या कारवाईमुळे वन्यजीव तस्करी आणि हस्तिदंताच्या वस्तूंच्या अवैध विक्रीला आळा घालण्यास मदत होणार असून, या प्रकरणातील पुढील तपास अहवालानंतर अधिक स्पष्टता येईल.