दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट

Share

अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले याची विचारणा केली. यावेळी त्यांनी खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजू नये, असे आवाहन केले.

अमरावती येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन अमरावती ग्रामीण कार्यालयात शेती, जमीन, घरे खरेदी-विक्री करण्यासाठी शासकीय नियमानुसार असलेल्या 2 टक्के शुल्काशिवाय अतिरिक्त पैसे घेतात, तसेच दलाल सक्रीय असल्याची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी स्वत: कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून खरेदीसाठी नोंदणी आणि मुद्रांकाशिवाय किती रक्कमेची मागणी करण्यात आल्याची विचारणा केली.

नागरिकांनीही पाच हजार रूपये देण्यात आल्याचे सांगितले. यावरून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यालयातील अतिरिक्त शुल्क आकारण्यावर नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी विहित केल्यापेक्षा अतिरिक्त पैसे स्विकारल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला. नागरिकांच्या तक्रारी पाहता येत्या काळात सर्व नोंदणी कार्यालयात आकस्मात भेटी देण्यात येतील. गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येईल. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group