मुंबई : (RetiMafiya) आमदार आणि महसूल अधिकाऱ्यांसह भाजपाच्या नेत्यांच्या आशिर्वादानेही आता रेती घाट अवैधरित्या जेसीपी च्या सहाय्याने उपसण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शेकापुर बाई घाटातून 5 कोटींपेक्षा अधिक किमतीची रेती चोरी झाली असून, याच माफियांनी आता दारोडा घाटाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप हिंगणघाट उपविभाग अधिकारी आकाश आवतारे, तहसीलदार योगेश शिंदे यांनी या बेकायदा उत्खननाकडे डोळेझाक केली आहे.
शेकापूर बाई घाटावर अवैध उत्खनन सुरूच (RetiMafiya)
वर्धेच्या शेकापूर बाई या घाटावरून अजूनही अवैध रित्या उत्खनन सुरूच आहे. एका आमदाराचा या माफियांना पाठिंबा असल्याचे बोलल्या जात आहे. शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनानंतर फक्त एकदाच पोलिसांकडून छापेमारी झाली. त्यात कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यापूर्वी आणि नंतर जवळपास 5 कोटींची रेती उत्खनन झाल्याच दिसून येते.
अमरावती जिल्ह्यातून 1700 ब्रास रेती ऑनलाइन बुकिंग
शासनाच्या घरकुल योजनेसाठी अमरावती जिल्ह्यातून वर्धा डीएमओ ऑफिस मध्ये ऑनलाईन तब्बल 1700 ब्रास रेती बुकिंग झाली आहे. दारोडा या घाटातील डेपो धारक निलेश सावरकर आहे. वर्धा जिल्ह्यात हजारो घरकुल बांधकामाचे काम सुरू असताना रेती मिळत नाही. मात्र, दारोडा आणि शेकापुर बाई घाटातून सर्रास अवैधरित्या रेती अमरावती पाठवण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गाचा फायदा रेती माफियांना
वर्धा जिल्ह्यातील सर्व अवैध रेती वाहतूक समृद्धी महामार्गाने सुरू आहे. या वाहतुकीला आरटीओ, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे त्याच घाटावरील एका सूत्रांनी सांगितले आहे.
हिंगणघाटच्या राजकीय नेत्यांकडून शेकापुर घाटातील रेतीची चंद्रपूर वाहतूक
राज्यातील एका मोठ्या पक्षाचा राजकीय नेत्याकडून शेकापूर बाई घाटातील अवैध रेती उपसा केला जात आहे. जेसीपीच्या सहाय्याने ही अवैध रेती उपसा करून थेट चंद्रपूर वाहून नेली जात आहे. याच घाटावर पुलगाव येथील पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा शेकापुर घाटातून अवैध रेती उत्खनन सुरू झाले आहे.