नेत्वा धुरी
मुंबई : Religious event in SGNP बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धार्मिक कार्यक्रमासाठी जंगलाचे नियम पायदळी तुडवण्याची सलग दुसरी घटना समोर आली. जुलै महिन्याच्या अखेरिस कावड यात्रेसाठी भाविक थेट नदीपात्रात उतरल्याने उद्यान प्रशासनावर टीकेची झोड उडालेली असताना शनिवारी पुन्हा नव्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भाविक नदीपात्रात उतरल्याचे उघडकीस आले. वनाधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने उद्यान प्रशासनाच्या बेजबाबदार वागणूकीबद्दल पर्यावरणतज्ज्ञांनी सडकून टीका केली. उद्यानाची सुरक्षितता आता धोक्यात आली आहे. प्रशासनाविरोधात आता न्यायालयीन लढाई लढावी लागेल, असा सज्जड इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला.
संजय गाधी राष्ट्रीय उद्यानात धार्मीक कार्यक्रम Religious event in SGNP
शनिवारी उद्यानातील कृष्णगिरी उपवन परिसरात हा प्रकार घडला. मालाड येथील सहस्त्र आदिच्य गोरवाल बह्मसमाजाकडून हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. या नावाचा फलक विभागीय कार्यालयासमोरील झाडावर लटकवला गेल्यावरही उद्यानातील वनसंपदेला हानी पोहोचवली गेल्याची टीका होत आहे. भाविकांनी नदीपात्रात अर्धनग्न अवस्थेत पाण्यात उतरले. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वनाधिका-यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. नदीत आंघोळ केल्यानंतर भाविकांनी विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावरच उर्वरित धार्मिक विधी पार पाडले. उद्यानात वाढत्या धार्मिक कार्यक्रमांबद्दल विचारणा करण्यासाठी वनसंरक्षक व संचालिका अनिता पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मी दुसऱ्या घटनेबाबात माहिती घेण्यासाठी दहिसरला आहे. भाविकांना नदीपात्राजवळ कार्य करण्याची परवानगी होती. नदीत उतरुन पूजा करण्याची परवानगी दिली नव्हती. केवळ पूजा करणार आहेत, ही कल्पना दिली गेली होती. काल यासंबंधी म्हात्रे नामक व्यक्ती मला भेटण्यास आले होते. भाविकांनी रितसर उद्यानातील तिकीट खरेदी करुन प्रवेश केला. याबद्दल मी अधिक माहिती घेत आहे. – योगेश महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृष्णगिरी उपवन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे धार्मिक कार्यक्रम पार्क झाले आहे. धार्मिक आणि मनोरंजनाचेही कार्यक्रम सुरु करा. लोकांना एस्सेलवर्ल्डला जाण्याची गरज भासणार नाही. हा न्यायालयीन लढा व्हायला हवा. – डी. स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ आणि कार्यक्रम संचालक, वनशक्ती