मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द गावातील रत्नशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा खून १२ मार्च रोजी झाला. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं रत्नशिव निंबाळकर याची पत्नी प्राजक्ता निंबाळकर, बहीण शीतल शिंदे लहान मुलांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. रत्नशिव निंबाळकरच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करावी अशी मागणी केली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नशिव निंबाळकरच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल असे निर्देश द्यावेत, असं त्यांनी म्हटलं.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अतिशय हादरवून सोडणारी घटना घडलीय. आदर्की खुर्द गावातील रत्नशिव निंबाळकर या ३२ वर्षीय तरुणचा निघृण खून करण्यात आला आहे. ही घटना १२ मार्चला घडली आहे. आजपर्यंत यातील मुख्य आरोपी फरार आहे. घटना घडली तेव्हा मुंबईत नव्हते त्यावेळी एसपींशी बोलले होते, त्यांनी सहआरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपीला अटक होईल असं सांगितलं होतं. मात्र, मुख्य आरोपीला अटक झाली नाही,त्यामुळं कुटुंब भेटायला आलं आहे.
रत्नशिव निंबाळकर पत्नी, मुलांसह ,आई वडील अन् विधवा बहीण आणि तिच्या मुलांचा सांभाळ करत होता.फक्त गावात नाव बदनाम केल्याच्या रागातून दत्तात्रय निंबाळकर यानं रत्नशिव निंबाळकराला गाडीनं ठोकून आणि त्यानंतर कोयत्यानं वार करुन संपवलं. रत्नशिव निंबाळकर बहिणीच्या मुलाला परीक्षेसाठी सोडायला निघाले होते. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. सातारच्या एसपींशी बोलले आहे. त्यांनी पाच दिवसात मुख्य आरोपीला अटक करु असं म्हटलं आहे.
मुख्य आरोपी दत्तात्रय निंबाळकर याचा भाऊ सुरेश निंबाळकर भाजपचा फलटणचा सरचिटणीस आहे. भाजपला विनंती करायची आहे की तात्काळ सुरेश निंबाळकरला पदावरुन बाजूला करा किंवा अटक होईपर्यंत पदावरुन बाजूला करण्यात यावं. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असला तरी असं करणं चुकीचं आहे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
रत्नशिव निंबाळकरची पत्नी काय म्हणाली?
रत्नशिव निंबाळकर यांच्या पत्नी प्राजक्ता निंबाळकर यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या त्यांचे पती रत्नशिव निंबाळकर नणंदेचा मुलगा आहे त्याला परीक्षेला सोडण्यासाठी गेले होते. मुलाला सोडल्यानंतर त्यांनी नाश्ता केला. तिथून परत येत असताना गाडीनं उडवलं त्यानंतर डोक्यात वार केले, असं प्राजक्ता निंबाळकर म्हणाल्या. पतीला न्याय मिळाला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
रत्नशिव निंबाळकर यांची बहीण शीतल शिंदे यांनी देखील भावाला न्याय द्यावा अशी मागी केली. दत्तात्रय ऊर्फ काका यानं अपघाताचा बहाणा घडवून आणत भावाच्या डोक्यात कोयत्यानं वार केल्याचं म्हटलं. आठ दिवसानंतर एफआयर दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं.राजकारणातून दबाव येतोय असं आमच्या लक्षात येतेय, असं शीतल शिंदे म्हणाल्या.