प्रदीप पंजाबराव दंदे 9423622628
“R. S. Gavai: A steadfast champion of democracy and a visionary leader.” २५ जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे रिपब्लिकन नेते, माजी राज्यपाल, आणि माजी विधान परिषद सभापती रा. सू. गवई यांच्या स्मृतींना उजाळा देतो. ‘दादासाहेब’ या नावाने परिचित असलेले रामकृष्ण सूर्यभान (रा. सू.) गवई हे एक राजबिंडे व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी समर्पित केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) अध्यक्ष म्हणून त्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कार्य केले.
केरळचे राज्यपाल म्हणूनही त्यांचे कार्य “R. S. Gavai: A steadfast champion of democracy and a visionary leader.”
दादासाहेबांचा जन्म १९२९ साली अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत गौरवशाली होती. विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचे उपसभापती, विधानपरिषदेचे सभापती, अमरावी लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार आणि बिहार, सिक्कीम, केरळ राज्यांचे राज्यपाल अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले.
१९६४ ते १९९४ पर्यंत सलग ३० वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) होते. या काळात त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती (१९६८-७८) आणि सभापती (१९७८-८२) म्हणून काम केले. तसेच, दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (१९८६-८८ आणि १९९०-९१) म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रत्येक पदावर असताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची आणि दूरदृष्टीची छाप सोडली.
विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपली आणि संसदीय कामकाजात नैतिकता व शिस्त आणली. त्यांचे निर्णय नेहमीच नियमांवर आधारित आणि निःपक्षपाती असत. राज्यपाल म्हणून त्यांनी राज्याच्या संवैधानिक प्रमुखपदाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. राजकारणाबरोबरच त्यांना साहित्य आणि वाचनाची आवड होती.
रा. सू. गवई हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांनी दलित, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष केला. शिक्षणाचे महत्त्व ते नेहमीच अधोरेखित करत असत आणि समाजाच्या विकासासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यासाठी त्यांनी शिक्षण संस्थेचे जाळे उभारले. नागपूर येथील दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉ.आंबेडकर महाविद्यालय हे नागपुरातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून लौकिकास पात्र ठरले आहे.
रा. सु. गवई यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भूमिहीन सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला होता. १९६४ च्या भूमिहीनांच्या आंदोलनाने देशभरात लक्ष वेधले होते. खेड्यातील भूमिहीन अस्पृश्यांना पडीक जमिनी मिळाव्यात आणि जमिनीवर सीलिंग लावून ती जमीन अस्पृश्यांना देण्यात यावी, ही या आंदोलनाची मुख्य मागणी होती. डॉ.आंबेडकरांनी देशभरातील पडीक जमीन भूमिहीनांना देण्यात यावी अशी मागणी रेटली होती. त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन पक्षाने देशभर भूमिहीनांना जमिनी देण्यात याव्या यासाठी आंदोलन केले होते.
देशातील पडीक जमिनीचे भूमिहीन अस्पृश्यांना वाटप झाले तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, अशी या आंदोलनामागे भूमिका होती. रिपब्लिकन पक्षाने देशभर केलेल्या आंदोलनामुळे ”सीलिंग ॲक्ट’ कायदा करण्यात आला आणि एस. सी., एस. टी. समुदायातील लाखो भूमिहीनांना जमिनीचे वाटप करण्यात आले हे रिपब्लिकन पक्षाने केलेल्या भूमिहीनांच्या आंदोलनाचे यश होते.
रा. सु. गवई हे केवळ भूमिहीन आंदोलनापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी नवबौद्धांना सुविधा मिळाव्यात यासाठीही आंदोलने केली होती. दीक्षाभूमी स्मारकाच्या उभारणीतही त्यांचे मोठे योगदान होते. दीक्षाभूमीचे शिल्पकार म्हणून ही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कार्यामुळे दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
आजही रा. सू. गवई यांचे विचार आणि कार्य आपल्याला प्रेरणा देतात. लोकशाही मूल्यांचे जतन, सामाजिक सलोखा आणि समानतेसाठीचा त्यांचा आग्रह आजही तितकाच प्रासंगिक आहे. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहताना, त्यांच्या कार्याची आणि विचारांची पुढच्या पिढीला ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्यासारख्या निस्सीम लोकशाही पाईकांच्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही.