polluting vehicles; तुमच्या वाहनाची पियूसी नाही; तर धोक्याची घंटा…

Share

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 

मुंबई: (polluting vehicles) तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार  व इतर अधिकारी उपस्थित होते.

पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायु प्रदूषण (polluting vehicles) 

ते पुढे म्हणाले, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायु प्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control Certificate)  प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. तथापि, ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात किंवा सदर प्रमाणपत्र बोगस असल्याच्या देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने वायु प्रदूषणा मध्ये वाढ होत आहे. 

वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) वेगाने घसरत चालला आहे. त्याला बऱ्याच अंशी  तांत्रिक दृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात  क्विक रिस्पॉन्स कोड (Q. R. CODE) आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणारा असून, प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशकां नुसार तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे वैद्य प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल. पीयूसी नाही तर इंधन नाही (No P.U.C. No fuel) अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे.

पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने भावी पिढीचा देखील विचार केला पाहिजे! त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी, यासाठी आत्ताच वायु प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कडक  नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group