NileshSambare; कोकणच्या समाजकारण-राजकारणातील आश्वासक चेहरा निलेश सांबरे

NileshSambare
Share

  • लेखक – अॅड.विवेक ठाकरे, उच्च न्यायालय मुंबई

मुंबई : (NileshSambare) निसर्गाची भरभरून उधळण लाभलेली निसर्गभूमी म्हणून कोकणच्या पुण्यभूमीचा उल्लेख करावा लागेल. सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत तब्बल 720 किलोमीटरचा नित्तांतसुंदर समुद्रकिनारा, आंबा – पोफलीच्या बागा, सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकणची सुपीक जमीन, केरळप्रमाणे मुबलक व मुसळधार पाऊस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी बसवण्यासाठी रायगडची निवड केली इतका हा महत्वाचा प्रांत. भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख ही याच रायगडमधील नाते गावचे. मधू दंडवते यांनी कोकणात रेल्वे आणण्यासाठी जीवाचे रान केले. कोकणाला आतापर्यंत तीन मुख्यमंत्रीपद लाभले. पण आजही कोकणची पुण्यभूमी सुजलाम सुफलाम झाली नाही आणि कोकणचा कैलिफॉर्निया करण्याचे स्वप्नही स्वप्नच राहिले आहे.

2019 साली जिजाऊ संघटनेची स्थापना (NileshSambare)

याच काळात कोकणातील समाजकारणात – राजकारणात निलेश भगवान सांबरे नामक एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय अल्प काळात कोकणच्या विकासाचे मॉडेल उभे केले आहे. स्वतःच्याच उद्योगातून मिळालेला पैसा त्यांनी समाजकारणासाठी लावला आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमिकरण, शेती, रोजगार, सहकार अशा विविध माध्यमातून संस्थेचे काम सुरु आहे. जिजाऊ संस्थेचे काम करताना हे सामाजिक काम अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी सन 2019 साली जिजाऊ संघटनेची स्थापना केली. या व मागील लोकसभा – विधानसभा निवडणुकीत काही आमदार – खासदार निवडून आणण्यात जिजाऊचा मोठा हातभार होता. भिवंडी लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी तब्बल 2 लाख 30 हजार मते मिळवून एक नवा विक्रम केला आहे.

2020 मध्ये अपक्ष निवडून येत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष

सन 2020 साली पालघर जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीसोबत तब्बल 13 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आणि स्वत: अपक्ष विजयी होऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले होते. या काळात त्यांनी जिल्हा परिषदचा भत्ता, गाडीही न घेता जिल्हा परिषदचा कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांसाठी आदर्श घालून दिला. पालघरमधील विक्रमगड नगरपंचायतीतही सर्व 17 जागी आपले नगरसेवक निवडून आणून एकहाती विजय मिळवला. जव्हार – मोखाडा, तलासरी नगरपंचायतमध्येही अनेक नगरसेवक जिजाऊ संघटनेचे आहेत तर ठाणे- पालघर जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतमध्ये जिजाऊची सत्ता आहे. सध्यास्थितीत ठाणे- पालघर जिल्ह्यात जिजाऊ संघटनेच्या हजारो शाखा असून कोकणच्या भूमीत जिजाऊच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी आपल्या कामाचा दबदबा तयार केला आहे.

शिक्षित कोकण – सक्षम कोकण

कोकणातील तळागाळातील विद्यार्थी शिकावेत म्हणून जिजाऊ संस्थेकडून दरवर्षी कोकणातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये 25 लाख वह्यांचे वाटप होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यात तब्बल 10 मोफत सीबीएससी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरु केले आहेत. आठवीपासूनच विद्यार्थ्यांची JEE / NEET व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना JEE / NEET परीक्षांसाठी आयआयटी शिक्षक नेमून मोफत मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत केली जाते. तर करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा उपलब्ध होत आहेत. जिजाऊ मिशन अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मोफत क्लासेस घेतले जातात. ठाणे सारख्या शहरातही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासिका सूरू करून व त्यांना मोफत शिक्षण व प्रशिक्षण देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आरोग्यदायी कोकण

कोकणातील लोकांचे आरोग्य सुधारावे यासाठी ठाणे – पालघरसह कोकणात दरवर्षी सातशेच्यावर आरोग्य शिबिरे घेवून ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जातात. पालघरमधील झडपोली येथे जिजाऊ संस्थेने श्री. भगवान महादेव सांबरे नावाने 130 खाटांचे निःशुल्क सुसज्ज हॉस्पिटल उभारले आहे. यात महिला व बालकांसाठी विशेष कक्ष, डायलिसिस सुविधांसह आयसीयू, एनआयसीयूपासून कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रियापर्यंत सर्व शास्त्रक्रिया मोफत केल्या जातात. महिला प्रसूतीगृहाची सुविधा उपलब्ध झाल्याने दुर्गम भागातील माता व बालमृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे. तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे सुसज्ज कॅन्सर आणि जनरल हॉस्पिटल प्रस्तापित आहे. नुकतेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे 150 बेडचे सुसज्ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. येथेही सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचार मोफत आहेत.

जिजाऊ संस्थेच्या पाच कार्डियाकसह 25 रुग्णवाहिका कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये दिवसरात्र रुग्णांची सेवा करत असतात. दरवर्षी 200 च्यावर रक्तदान व नेत्रदान शिबिरे घेतली जातात आणि गरजवंतांना मोफत रक्त पुरवले जाते. वेळोवेळी कैन्सर निदान शिबिरेही घेतली जातात. एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे व आरोग्य सुविधांअभावी दगावला जाऊ नये, हे संस्थेचं ध्येय्य आहे.

कोकणच्या मातीतून अधिकारी घडवण्यासाठी

कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा, शासकीय सेवा भरती, नीट परीक्षा आणि पोलीस भरती अशा स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडवून कोकणाच्या विकासाचा एक वेगळा मार्गही संस्थेनं निवडला आहे. यासाठी पालघरमधील झडपोली येथे सर्व सुविधायुक्त निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. येथे कोकणासह राज्यभरातील विद्यार्थी येवून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ४५ स्पर्धा परीक्षा वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. संस्थेच्या या उपक्रमातून आतापर्यंत 500 हून अधिक अधिकारी घडले आहेत तर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी खाजगी व शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. जिजाऊ पोलिस अकादमीच्या माध्यमातून कोकणात 25 ठिकाणी पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. यातून आतापर्यंत शेकडो तरुण पोलिस सेवेत दाखल झाले आहेत. 200 हून अधिक विद्यार्थी आर्मी, बीएसएफ, सीआरपीएफ, मर्चंड नेव्ही, एमएसएफ तथा फॉरेस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये दाखल झाले आहेत. तर फायरब्रिगेड ट्रेनिंगच्या माध्यमातून सन 2023 साली तब्बल 107 तरुण अग्निशमन सेवेत दाखल झाले.

दरवर्षी संस्थेकडून आयआयटी आणि एमबीबीएससाठी 5 ते 10 विद्यार्थी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतात. जिजाऊ अकॅडमीचे स्वप्निल माने हे सन 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून 578 रँकने उत्तीर्ण होऊन आयपीएस झाले.

क्रीडा क्षेत्रातही जिजाऊचा झेंडा

जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून झडपोली येथे खो-खो, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, व मॅटवरील कबड्डीसाठी खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी जिजाऊ संस्थेकडून दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी कोकणातील सर्वात मोठी “कोकण वर्षा मॅरेथॉन” आयोजित करण्यात येते. ग्रामीण भागात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी संस्थेच्या कु. मनाली जाधव व गौरी जाधव या कुस्तीपटू सह्याद्री रेसलिंग स्कूल, पुणे येथे प्रशिक्षण घेतले. नाशिकच्या कविता राऊत फॉउंडेशनच्या ॲथलेटिक्स ॲकेडमीत तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून 25 खेळाडूंना कोचिंग सुविधा उपलब्ध केली. या खेळाडूंचा सर्व खर्च संस्था करते. जिजाऊचे खेळाडू कु. कविता भोईर, ज्ञानेश्वर मोरघा, हर्षदा पाटील, श्री.धर्मेंद्र कुमार यादव यांसारखे अनेक खेळाडू राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत.

जिजाऊ महिला सक्षमीकरण विभाग

जिजाऊ महिला सक्षमीकरण विभागांतर्गत कोकणातील महिलांना संघटित व सक्षम करण्याचे संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत. आशा गृहोद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असते. महिलांना स्वयंरोजगारासाठी पीठगिरणी, शिलाई मशिन, पत्रावळी मशिन, केटरिंग सेट, हातगाड्या, उसाचे चरखे, गारमेन्ट फॅक्टरी, अगरबत्ती, फिनाईल, कापूर बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून आजवर हजारो महिलांना रोजगार दिला आहे. तसेच ब्यूटी पार्लर प्रशिक्षण, टेलरिंग प्रशिक्षण, फॅशन डिझाइनिंग, संगणक प्रशिक्षण, टैली, रिक्षा चालक प्रशिक्षण असे विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देवून आजपर्यंत हजारो महिलांना त्यांच्या पायावर उभे केले आहे.

शेती व शेतकरी सक्षम करण्यासाठी

निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातील शेती फायद्याची ठरावी यासाठी संस्थेचे काम सुरु आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना पाच लाख फळझाडांचे वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांना बियाणे व प्रशिक्षण मोफत पुरवले जाते. दुग्धव्यवसाय, मत्यव्यवसाय, फलोत्पादन, भाजीपाला याचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. शेतकऱ्यांना बारमाही बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी संस्था प्रयत्न करते. प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समित्या व्हाव्यात तसेच नद्यांना बंधारे बांधून बारमाही शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. कोकणाला सुजलाम सुफलाम बनवण्याचा जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांचा मानस आहे.

तरूणांना रोजगार

प्रत्येक तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबवले जातात. त्यासाठी रोजगार साधने पुरवत खास प्रशिक्षणाचाही प्रयत्न असतो. वाडा येथे जिजाऊ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असून यात शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यात १) मोटार मॅकेनिकल, २)इलेक्ट्रिशियन 3) नर्सिंग ४) MSCIT & Tally यांचे प्रशिक्षण दिले जाते. ठाणे शहरामध्येही कॉम्पूटर, ग्राफिक्य डिझायनिंग व डिजिटल मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण सुरु असून येत्या वर्षभरात 1200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.

दिव्यांग मुलांची निवासी शाळा

झडपोली येथे सन 2016 साली जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा उभारण्यात आली. या शाळेत 105 आदिवासी व गरीब दिव्यांग मुले दत्तक घेवून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची, राहण्याची व इतर सर्व सुविधांची व्यवस्था संस्थेमार्फत मोफत करण्यात आली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी 5 अंध मुली UPSC ची तयारी जळगाव येथे करत असून त्यांचा संपूर्ण खर्च संस्थेमार्फत केला जातो. तसेच शाळेतील अंध मुलांना संगीत शिक्षण व कॉम्प्युटर प्रशिक्षण देखील दिले जाते. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ऑनलाईन 50 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात या मुलांनी सहभाग घेत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून संस्थेचा लौकीक वाढवला.

संकट जिथे, जिजाऊ तिथे..!

  • राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटात जिजाऊ संस्था मदतीसाठी पुढे सरसावत असते.
  • सन २०१९ साली सांगली, सातारा व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात जिजाऊ मदतीसाठी पुढे सरसावली. अन्नधान्य किट, २० हजार ब्लँकेट्स, दोन लाख वह्यांचे पुरग्रस्तांना आणि विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. १५ दिवस संस्थेची टीम व डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकांसह या भागांमध्ये कार्यरत होते.
  • महाड, रायगड येथे आलेल्या महापुरातही हजारो अन्नधान्य किट, पाणी बॉटल, बिस्किट, ब्लँकेट्स व वह्यांचे पुरग्रस्तांना आणि विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. येथेही अनेक दिवस संस्थेची टीम व डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकांसह कार्यरत होते.
  • कोविडकाळात मुंबई- अहमदाबाद, भिवंडी-नाशिक, पालघर – नाशिक, कल्याण-आळेफाटा या रस्त्यांवर पायी प्रवाशांची जेवणाची व राहण्याची सोय केली.
  • कोविड काळात ठाणे-पालघर जिल्ह्यात १ लाख गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य किट वाटण्यात आले.
  • कोविडमध्ये ५०० खाटांचे कोविड रुग्णालय झडपोली येथील शाळेमध्ये विनामुल्य उभारण्यात आले.
  • सन २०२२ मध्ये कोकणात आलेल्या चक्रीवादळात छप्पर उध्वस्त झालेल्या शेकडो नागरिकांना घरे पुन्हा उभी करण्यासाठी सिमेंट पत्रे आणि इतर साहित्य पुरवून आधार देण्याचे काम संस्थेने केले.
  • ठाणे येथील कोपरी परिसरात कचऱ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी राहणारी झोपडपट्टीतील मुले साक्षर व्हावीत यासाठी त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पूर्ण करत आहे आणि त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणत आहे.
  • पालक गमावलेल्या अनेक निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.

कृतज्ञतेची भाऊबीज… मायेचे रक्षाबंधन..!

सन 2020 पासून कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून कार्य केलेल्या आशासेविका, आरोग्यसेविका आणि महिला पोलिस भगिनी अशा ठाणे – पालघर जिल्ह्यातील दहा हजार भगिनींना दरवर्षी संस्थेच्या वतीने पैठणी भेट देवून कृतज्ञतेची भाऊबीज करण्यात येते. या हजारो बहिणीही दरवर्षी झडपोली नगरीत येवून मायेचे रक्षाबंधन साजरे करतात.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी वा पद नसतानाही अवघ्या काही वर्षात निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून कोकणासाठी प्रस्थापित पक्षांइतके मोठे काम उभे केले आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचे कार्य आव्हान वाटते. मात्र जिजाऊचे विचार हे विकासाचे आणि पिंड समाजसेवेचा आहे. कोकणच्या राजकारणातील नव्या विचारांचा आश्वासक चेहरा म्हणून निलेश सांबरे यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे हे मात्र नक्की..!

संस्थेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता:

श्री.केदार सखाराम चव्हाण,
सचिव, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र
कार्यालय – 1103, देव कॉर्पोरा,
कॅडबरी जंक्शन, ठाणे (प), 400 601
संपर्क – 7208612222/8007404222
http://www.nileshsambare.org
http://www.jijau.org


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group