नेपाळमध्ये राजेशाही बहालीच्या मागणीसाठी शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली. काठमांडूच्या तिनकुनेमध्ये हजारो राजेशाही समर्थक रस्त्यावर उतरले आणि एका इमारतीची तोडफोड केली. नंतर तिला पेटवून दिले. पोलिसांवर दगडफेक केली. सुरक्षा दलाने अश्रुधुराचा मारा केला. या धुमश्चक्रीत एक निदर्शक व एका पत्रकाराचा मृत्यू झाला. प्रशासनाने काठमांडूत संचारबंदी लागू केली. लष्कर तैनात केले. निदर्शकांनी ‘राजा आआे, देश बचाआे, ‘भ्रष्ट सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे समाजवादी मोर्चाने भृकुटीमंडप येथे विरोधात आंदोलन केले.
भ्रष्टाचार, बेरोजगारी, सत्तापालट यामुळे आता जनता प्रचंड त्रस्त
आंदोलनात ४० हून जास्त संघटना सहभागी झाल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, अशी धमकी संघटनांनी सरकारला दिली. आंदोलनाचे नेतृत्व नवराज सुवेदी करत आहेत. ते राजसंस्था पुनर्स्थापना आंदोलनाशी संबंधित आहेत. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे प्रमुख राजेंद्र लिंगदेन यांनीही त्यास पाठिंबा दिला. घटनात्मक राजेशाही व हिंदू राष्ट्राची बहाली हीच देशातील समस्यांवरील तोडगा ठरेल, असे या संघटनांचे मत आहे. नेपाळमध्ये २००६ मध्ये राजेशाही विरुद्ध बंड झाले होते.
विरोधानंतर राजा ज्ञानेंद्र यांना तत्काळ सत्ता साेडावी लागली होती. सर्व अधिकारी संसदेकडे सोपवले गेले. २००८ मध्ये २४० वर्षांची परंपरा असलेली राजेशाही संपुष्टात आली होती. त्यामुळे हिंदू राष्ट्राचे रूपांतर धर्मनिरपेक्ष, संघराज्य, लोकशाही देशात झाले होते. परंतु आता जनता भ्रष्टाचार, बेरोजगारी, वारंवार सत्तापालट या गोष्टींना वैतागली आहे. यातूनच राजेशाही पुन्हा यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र यांनी १९ फेब्रुवारीला लोकशाही दिनी लोकांचे समर्थन मागितले होते. तेव्हापासून ‘राजा आआे, देश बचाआे’ आंदोलनाची तयारी सुरू झाली होती. नेपाळमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमांवरी सुरक्षा वाढवली आहे.
ज्ञानेंद्र यांच्या भाषणाने चिथावणी
माजी राजा ज्ञानेंद्र यांनी लोकशाही दिनी (१९ फेब्रुवारी) केलेल्या अभिभाषणातील संदेशाने राजेशाही बहालीची मागणी वाढली. समर्थक रस्त्यावर उतरले. समर्थकांनी ९ मार्चला ज्ञानेंद्र यांच्या समर्थनार्थ रॅलीही काढली. काही समर्थकांनी राजा ज्ञानेंद्र यांच्या छायाचित्रासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रही झळकवले होते.