शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही
नांदेड : (Ncp Ajit pawar) देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती Ncp Ajit pawar
आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
पवार म्हणाले की, भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल.
त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून पवार यांनी शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.