अजित पवारांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक
मुंबई : Nashik Hemlata Patil joins the Nationalist Congress Party नाशिकमधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशामुळे राज्यात सत्ता मिळवल्याबद्दल महिला कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
नॅशनल क्रिकेटपटू मनोज पालखेडे यांचाही प्रवेश Nashik Hemlata Patil joins the Nationalist Congress Party.
महिला विकास मंडळ सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात नाशिक शहर आणि देवळाली मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात नॅशनल क्रिकेटपटू मनोज पालखेडे यांचाही समावेश होता.
आपल्या भाषणात अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा केली. “या योजनेत राज्यातील लाडक्या बहिणींनी आपली चांगली जबाबदारी पार पाडली आणि आम्हाला सत्तेत बसवले. त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही कधीच विसरू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी महिला कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पक्षाची विचारधारा स्पष्ट करताना पवार म्हणाले, “आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेनेच आपला पक्ष पुढे नेत आहोत. महाराष्ट्राला अनेक महापुरुषांचा वारसा लाभलेला असल्याने राज्यात जातीय सलोखा राखण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
राज्याच्या विकासावर भर देताना त्यांनी म्हटले,
“आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे याचा विचार आपल्या मनात असला पाहिजे. प्रगत राज्य म्हणून राज्याची जी ओळख आहे, त्याला गालबोट लागू नये.”
निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर बोलताना त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “देशात जिवंत लोकशाही आहे आणि सुज्ञ जनता मोठ्या विचाराने मतदान करते. निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांनी निवडणूक आयोगावर लावलेल्या आरोपांवरून त्यांना सुनावले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, “आपली जबाबदारी पक्ष संघटना वाढवण्याची आहे, पण पदाधिकारी म्हणून काम करताना कायदा हातात घेऊ नका. संविधानाचा आदर करून, कायद्याच्या चौकटीत राहून आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.
या पक्षप्रवेश सोहळ्याला छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते. पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.