मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
नाशिकमध्ये लाडक्या बहिणी जीव धोक्यात घालून विहीरीत उतरतात (NarendraModi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. ‘हर घर नल, हर नल जल’ ही घोषणा केवळ पोस्टरवरच दिसली, प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये परिस्थिती भयावह असून पाण्याचे दुर्भिक्ष्य पडले आहे.
2025 मध्येही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन
वर्ष 2025 उजाडले त्यानंतरही नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील लाडक्या बहिणी अजूनही पाण्यासाठी हंडा घेऊन डोंगर-दऱ्या ओलांडाव्या लागतात. एवढंच नाही, तर अनेक ठिकाणी त्या जीव धोक्यात घालून कोरड्या पडलेल्या विहीरीत उतरतात – केवळ एक हंडा पाण्यासाठी हे सरकारचे फक्त अपयशच नाही तर ही संवेदनशून्यतेचे आणि पोकळ घोषणाबाजीचे भीषण वास्तव आहे.
अद्यापही मोदी सरकारच्या अनेक योजना कागदावरच आहेत, घोषणा सभांमध्ये गाजतात, पण जमिनीवरचं वास्तव आजही पाण्यासाठीची लढाई दिसून येत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिका केली आहे.