Msrtc; एसटीला उभारी देण्यासाठी तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू

Share

मुंबईः (Msrtc) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत असून उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली असून यातून यश मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. पण पूर्वी नेमलेल्या सल्लागारांचा अनुभव काही चांगला नाही. त्या मुळे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. एवढीच शंका असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

यापुर्वीच्या सल्लागाराचा अनुभव वाईट, एसटीचे नुकसान (Msrtc)

एसटीच्या पडीक मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी व प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक नवनवीन गाड्या सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बांधकाम क्षेत्रातील नामांकित तज्ञ सल्लागार व ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञ सल्लागार नेमण्यासाठी हालचाली सुरू आहे. तसा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत येणार असल्याचे खात्रीलायक समजत आहे. हा निर्णय एसटीच्या दृष्टीने खरोखरच चांगला व आशादायी असला तरी या पूर्वी एसटीने विविध प्रकल्पा करिता नेमलेल्या सल्लागार कंपनीचा अनुभव पाहिला तर सदर कंपनी कडून अपेक्षित फायदा झालेला नाही.

1310 गाड्या निविदाप्रक्रीयेत कंपनीचे मार्गदर्शन अपयशी

उलट या सल्ल्यासाठी करोडो रुपयांची रक्कम कंपनीला देण्यात आली आहे. व त्यातून फारसे काही हाताला लागले नसल्याचे दिसून येत आहे. हल्लीचे उदाहरण द्यायचे झाल्यास भाडे तत्वावरील १३१० गाड्या घेण्याच्या निविदेत एका सल्लागार कंपनीकडून मार्गदर्शन घेण्यात आले होते. त्यात सपशेल अपयश आले. व सदरची निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली. या कंपनीने पूर्वी दिलेल्या सल्ल्यातूनही महामंडळाला फायदा झाला नाही. असेही दिसून आले आहे.

असे असले तरी विविध प्रकल्प व योजना या करिता एसटीला तज्ञाची गरज असून एसटीकडे अनेक वर्षापासून १३६० हेक्टर इतकी जमीन पडीक असून तिचा विकास होऊन त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळाले पाहिजे. पण त्याला यश मिळालेले नाही. ३० वर्षावरून ६० वर्षे लीज वाढऊनही विकासक मिळताना दिसत नाहीत. उदाहरण द्यायचे झाल्यास बोरिवलीच्या जागेची निविदा प्रक्रिया तीन वेळा राबविण्यात आली. पण तरीही विकासक मिळालेले नाहीत.

भिवंडी येथील जागेचाही विकास करायला विकासक मिळालेले नाहीत. राज्यात बहुतेक ठिकाणी तीच अवस्था असून मोकळ्या जागांचा विकास टप्पा टप्प्याने करण्यात येऊन त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळाले पाहिजे. या शिवाय ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञ सल्लागार नेमला जाणार असून तो नेमला किंवा नेमला नाही तरी त्याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण आता या विभागात १०० पेक्षा जास्त इंजिनियर असून गाड्या जुन्या व मोडकळीस आलेल्या असल्यामुळे त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.

पण तरीही बांधकाम व यांत्रिकी या दोन विभागांना सल्लागार नेमतानाच उत्पन्न व प्रवासी वाढीसाठी सुद्धा असाच प्रयोग करण्याची आवश्यकता असून त्यासाठी सुद्धा सल्लागार नेमण्याची गरज आहे. कारण विजेवरील २२० व स्वमालकीच्या १२०० नवीन गाड्या ताफ्यात दाखल झाल्या नंतरही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात महामंडळाला यश आलेले दिसत नाही. एसटीचे नवे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामाची सुरुवात, पद्धत व धडाका पाहता ते प्रवाशी उत्पन्न वाढीचे उदिष्ट साध्य करू शकतील अशी अपेक्षा करायला सद्या तरी हरकत नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group