नेत्वा धुरी
ठाणे : बोरिवलीला जोडणा-या भूयारी मार्गासाठी आता रात्रीही खोदकाम केले जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलातील भूयारी मार्गातून हा रस्ता तयार केला जात आहे. या खोदकामासाठी वनविभागाने राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाकडे परवानगीचे पत्र लिहिले आहे. येत्या २ दिवसांत राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाकडून जंगलातून जाणा-या भूयारीमार्गाच्या खोदकामासाठी परवानगी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ते बोरिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत mmrda to start Night Work on Underground
येत्या तीन वर्षांत हा भूयारी मार्ग सुरु करण्याची राज्य सरकारची योजना आहे. हा भूयारी मार्ग सुरु झाल्यास ठाणे ते बोरिवली हा प्रवास केवळ १५ मिनिटांत करता येईल. ठाणे-बोरिवली भूयारी मार्ग हा मुंबईतील महत्त्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलाखालून हा भूयारी मार्ग तयार होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हा प्रकल्प राबवला जात आहे. ठाणे येथील मानपाडा येथे गेल्या काही महिन्यांपासून कामांना सुरुवात झाली आहे. या भूयारीमार्गाच्या खोदकामासाठी आवश्यक असणा-या मशीनचे काम रात्रंदिवस सुरु ठेवावे लागते. मशीन चोवीस तास कार्यरत राहते. मशीनची कार्यपद्धती लक्षात घेता जंगलातील खोदकामात रात्रीही काम सुरु ठेवावे लागेल.

याकरिता राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाकडून परवानगीची आवश्यकता असते. यासंबंधित परवानगीठी राज्याच्या वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याच्या अतिरिक्त संचालक (पर्यावरण) यांना ७ जुलै रोजी परवानगी पत्र लिहिले. आवश्यक परवागी न मिळाल्यास प्रकल्पाच्या उभारणीसाठी दिरंगाई होईल, असा मुद्दा एम. श्रीनिवास राव यांनी नमूद केला.
ठाणे-बोरिवली भूयारी मार्गाची वैशिष्ट्ये
- ठाणे-बोरिवली प्रवास दीड तासांऐवजी केवळ १५ मिनिटांत पार करता येणार
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन्ही विरुद्ध दिशांनी जाणारी भूयारी मार्ग तयार केले जाणार
- ११ किमी लांबीचा भूयारी मार्ग जंगलाच्या आतून तयार केला जाईल
- चारचाकी हलकी आणि खासगी वाहनांना भूयारी मार्ग वापरता येईल
संबंधित विभागाकडून परवानगीकरिता पत्र दिले गेले होते. या पत्रातील मुद्दा राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. याकरिता पार पडलेल्या बैठकीसंदर्भात संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
– एम. श्रीनिवास राव, प्रधान वन्यजीव संरक्षक (वन्यजीव, वनविभाग, महाराष्ट्र