मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे.
प्रेरणादायी गोष्टींचे पुस्तक उपलब्ध (MelghatNews)
या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणुन परतवाडा येथील ॲड. आभिषेक शुक्ला, कॉम्रेड याकूब पठाण, प्रभाकर वानखडे, तुळशीराम धुर्वे (मानव हक्क संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती. बाल वाचनालय हे प्रथम फाउंडेशन निर्मित शालेय विद्यार्थ्यांकरिता करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. ज्यामध्ये प्रेरणादायी गोष्टी, बोधकथाचे पुस्तक संच असून हे बाल वाचनालय मेळघाटातील 100 ठिकाणीं गावात, प्राथमिक शाळेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात, झोपडपट्टी परिसरात व अन्य ठिकाणीं सुरू करण्यात येणार आहे.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरिता मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता खोज संस्थेचे कार्यकर्ते बंडू साने, रामदास भिलावेकर, प्रतिभा आहाके, सचिन शेजव, गणेश मोरे, अविनाश बेलसरे, उषाताई बेलसरे, ज्योती बेलसरे, सोनू भुसारे, धर्मेंद्र शेरेकर तसेच टपालपुरा येथील विद्यार्थी, शिक्षण सखी ताई,या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.