मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वेळापत्रकात बदल होणार आहे. तसेच अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द राहणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारणीसाठी ब्लाॅक घेतला जाईल. यावेळी दोन क्रेनचा वापर करून पायाभूत कामे केली जातील. शनिवारी रात्री १.३० वाजता ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लाॅक सुरू असेल. ब्लाॅक कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल केला जाईल. तसेच, काही लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना ठाण्याला थांबा दिला जाईल.
गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२७०२ हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैनसागर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १११४० होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१५८ चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कर्जत – पनवेल – दिवामार्गे वळवण्यात येतील. तसेच कल्याण नियोजित थांबा असलेल्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. परळ येथून रात्री ११.१३ वाजता परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बदलापूर लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द केली जाईल. कर्जत येथून रात्री २.३० वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून अंशतः रद्द केली जाईल आणि अंबरनाथ येथून रात्री ३.१० वाजता सुटेल. कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून पहाटे ४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ६.०८ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक २२१७८ सिकंदराबाद -राजकोट एक्स्प्रेस पहाटे ४.१० ते ०४.३० वाजेपर्यंत वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ११०२२ तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेस पहाटे ४.१७ ते पहाटे ४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्थानकादरम्यान थांबवण्यात येईल. तर, उशिराने चालणाऱ्या मेल/एक्स्प्रेस/हॉलिडे विशेष रेल्वे गाड्या विभागीय गरजेनुसार वळवल्या जातील.