मुंबई : (Matang community for SC) अनुसूचित जाती व जमातीअंतर्गत उपवर्गीकरण करावे ही सकल मातंग समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी सकल मातंग समाजाने 20 मे रोजी आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन आयोजित केले असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सकल मातंग समाज महाराष्ट्र समन्वयक आणि प्रसिद्धी प्रमुख सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
सरकारला मातंग समाजाचा इशारा Matang community for SC
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अघ्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मातंग समाजाच्या नेत्यांनी भेट घेऊन या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे तर लवकरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेऊन त्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती राजहंस यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाअतंर्गत उपवर्गिकरण करण्यासंदर्भात या समाज घटकातील आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. पण अद्याप सरकारने याचा निर्णय घेतलेला नाही. या मागणीसाठी सकल मातंग समाजाने आतापर्यंत अनेक आंदोलने केली पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या समाज घटकाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा आंदोलन केले जात आहे असे राजहंस म्हणाले.