संदेश ढोणे यांचे १० जूनपासून आझाद मैदानावर उपोषण !
स्वप्नील ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (MSIDC) २०२३-२४ मध्ये काढलेल्या १५० ठेकेदार निविदांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, नियमभंग आणि संगनमताचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सुमारे ४०,००० कोटी रुपयांच्या कामांशी संबंधित असून वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई न झाल्याने जिल्हा परिषद पालघरचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे १० जूनपासून आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांसह राज्यपाल, मुख्यमंत्री व संबंधित यंत्रणांना पत्राद्वारे कळवले आहे.
पात्र ठेकेदारांना अपात्र दाखवत कुवत नसलेल्या ठेकेदारांना कामांचे वाटप
मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र टाईम्समधून प्रसिद्ध झालेल्या ई-निविदा सूचना (क्रमांक ०४ ते १०/२०२३-२४) अंतर्गत राज्यभरातील १५० विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये सहभागी ठेकेदारांची पात्रता, लखोटे उघडण्याची पद्धत, आणि अंतिम कामांचे वाटप या सर्वच टप्प्यांवर गंभीर प्रकारचे नियमभंग आणि अपारदर्शकता दिसून आली आहे. १००० कोटी रुपये किंमतीच्या कामांसाठी पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवण्यात आले आणि २०० ते ३५० कोटींच्या कामांसाठी अपात्र असलेल्या ठेकेदारांना काम देण्यात आले.
सुट्टीच्या दिवशी लखोटा उघडण्याचा धक्कदायक प्रकार
शनिवारी (सुट्टीच्या दिवशी) तांत्रिक लखोटा उघडण्यात आला आणि त्याच दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता १०-१५ मिनिटांच्या आत आर्थिक लखोटाही उघडण्यात आला. जवळपास सर्व निविदा ४% ते ४.९९% अधिक दराने मंजूर करण्यात आल्या, जे स्पर्धेविरहित आणि पूर्वनियोजित संगनमताचे स्पष्ट लक्षण आहे. शासन निर्णय दिनांक १२ एप्रिल २०१७ आणि २७ सप्टेंबर २०१८ मधील सर्व निकष व अटीही पायदळी तुडवण्यात आल्या आहेत.
निविदा मिळवण्यासाठी गुंडांचा वापर
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खाजगी व्यक्तीला नियुक्त करून ठेकेदारांकडून १०% ते १२% कमिशन स्वरूपात वसुली करण्यात आले असून बनावट बँक खाती उघडून, काही ठेकेदारांचे चेक या खात्यांत वटवून वैयक्तिक आर्थिक फायदा घेतल्याचा ठोस पुरावा असल्याचा दावाही संदेश ढोणे यांनी केला आहे.
“सरकारी कामात नियमबाह्य पद्धतीने हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालेला असताना संबंधित विभाग शांत आहे. लोकशाही मार्गाने मी सातत्याने पत्रव्यवहार केला, वैयक्तिक भेटी घेतल्या, पुरावे सादर केले, पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता हा लढा रस्त्यावर, आझाद मैदानावर सुरू करणार आहे. ही लढाई राज्यातील सामान्य जनतेच्या पैशाच्या गैरवापराविरुद्ध आहे.” – संदेश ढोणे, माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती, जि.प. पालघर
मागण्या:
१) १५० निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द कराव्यात.
२) भ्रष्टाचारात सहभागी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर आणि व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत.
३) भविष्यातील निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व डिजिटल निगराणीखाली ठेवावी.