मुंबई : (Mahatma Fule) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अनंत महादेवन दिग्दर्शीत फुले चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
फुले चित्रपट जगभरात प्रसिद्ध (Mahatma Fule)
जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहे की, 25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा “फुले” हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पहायला मिळावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
पुढे ते म्हणाले की, दलितांना पाण्याचा हौद खुला केला, शिक्षणासाठी दारे उघडे केली, स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा इतिहास नाही. तर त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की जसा १९ व्या शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला, तितकाच विरोध २१ व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास १२ सीन्स सेन्सॉर बोर्डाने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंचे विचार तोकडे पडले नाहीत.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या जोडप्याचा हा संघर्ष प्रवास प्रत्येकाने पाहायला हवा. त्यांच्याविषयी अपप्रचार करणाऱ्या जबाबदार व्यक्तींना सुद्धा हा चित्रपट आवर्जून दाखवावा. त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील अशी सुचनाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. या चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळेल. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.