मुंबईः (Maharashtra Transport) राज्यातील परिवहन विभागातील ब्लॅक कमाई आता कुठे लपुन राहीली नाही. राज्यातील आरटीओ कार्यालयापासून ते चेकपोस्ट पासून थेट आयुक्तालयापर्यंत लक्ष्मी दर्शनाचे वाटप करण्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहे. अशातच आता थेट बढत्या-बदल्यांचा संपुर्ण मलिदा खाता यावा यासाठी अडसर ठरणारे मंत्रालयातील परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनाच परिवहन आयुक्त कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी बदलण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्येच परिवहन विभागातील मोठे टेंडर सुद्धा काढण्यात येणार असल्याने यासंपुर्ण खाबुगीरीत मंत्रालयातील कोणीही अडसर ठरू नये यासाठी या अधिकाऱ्याने थेट मंत्रालयातीलच वरिष्ठांच्या उचलबांगडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
गृहविभागाचे उपसचिव चेतन निकम यांना होळकरांच्या ठिकाणी पर्याय (Maharashtra Transport)
येत्या काही दिवसात होणारी बढती-बदली आपल्याच हातात राहावी, त्यासाठी परिवहनमंत्र्यांनी सुद्धा आपल्याच पाठिशी राहावे यासाठी प्रयत्न चालवले आहे. त्यासाठी थेट मंत्रालयातील सहसचिवांची उलबांगडी करून त्यांच्याठिकाणी मर्जीतील गृहविभागाचे उपसचिव चेतन निकम यांना बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निकम यांची नियुक्ती शक्य न झाल्यास होळकर यांना बदलून इतर कोणत्याही मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार परिवहन आयुक्त कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकारी आणि चेतन निकम हे कृषी अभ्यासक्रमाचे महाविद्यालयीन मित्र आहे. त्यामुळे आयुक्त कार्यालयातील उच्च पदस्थ अधिकारी आपल्या मर्जीतील मित्राच्या नियुक्तीसाठी अथक प्रयत्न करतांना दिसून येत आहे.
असे असतील बढत्या – बदल्या
सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक ते मोटार वाहन निरिक्षक 350, मोटार वाहन निरिक्षक ते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 25-30, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 25-30, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ते प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी ते सहपरिवहन आयुक्त पदांच्या बढत्या होणार आहे. तर याच पदाच्या बदल्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे.