व्यवसायिक वाहनावर आता सामाजिक संदेश मराठीत अनिवार्य

Share

मुंबई : येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे.

तथापि, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहीलेले असतात. (उदा . बेटी बचाव बेटी पढाव) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारवर बंधने येतात. या पुढे असे सामाजिक संदेश, जाहीरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास ( उदा . मुलगी वाचवा..मुलगी शिकवा..!) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल.

तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्वाच्या जाहीराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरु करावी. तसे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group