कोकण ‘रेड अलर्ट’वर: मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या

Eknath Shinde Eknath Shinde
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तुषार पाटील
ठाणे : Konkan under ‘Red Alert’: Prioritize preventing loss of life कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आणि मनुष्य व पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे कोकण विभागातील अतिवृष्टीचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.

महत्त्वाचे निर्देश आणि आढावा Konkan under ‘Red Alert’: Prioritize preventing loss of life

जिल्हा प्रशासनाला सज्जता: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार या सर्व महानगरपालिका क्षेत्रातील गेल्या २४ तासांतील पावसाची माहिती घेण्यात आली. सर्वत्र सरासरी ८० ते १०० मि.मी. पाऊस झाला आहे.

नद्यांची स्थिती नियंत्रणात

ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी ती अजूनही धोकादायक पातळीपेक्षा खाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जीवितहानी टाळण्यावर भर

बदलापूर येथे एका व्यक्तीच्या वाहून जाण्याच्या घटनेव्यतिरिक्त इतर कुठेही जीवितहानी अथवा पशुधन हानी झालेली नाही. मात्र, रेड अलर्ट असल्याने रात्रीपर्यंत प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

स्थलांतरणाची सज्जता

ज्या ठिकाणी पाणी घरात शिरून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा जागा आधीच हेरून लोकांना पालिका शाळांमध्ये सुरक्षित स्थळी हलवावे. त्यांच्या जेवण आणि पाण्याची सोय करावी.

यंत्रणा ‘२४ × ७’ अलर्ट

सर्व आपत्कालीन यंत्रणांनी अलर्ट राहून आपले फोन २४ × ७ चालू ठेवावेत. वीज महामंडळाकडून तक्रारी येत असल्याने, त्यांनी फोन घेण्याच्या सूचनेचे कटाक्षाने पालन करावे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘ऑन फील्ड’ सज्ज राहावे.

धोकादायक इमारतींवर लक्ष

ठाणे, भिवंडी, उल्हासनगर मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष देऊन कोणतीही इमारत खचल्यास तात्काळ रिकामी करावी. धरणांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळ तैनात करावे.

वाहतूक कोंडी टाळा

मुंबई, ठाणे, भिवंडी आणि महामार्गावर वाहतूक कोंडी (ट्रॅफिक जॅम) होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे.

दरड कोसळण्याची शक्यता

रायगड भागात दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास तेथील गावे तातडीने रिकामी करून लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे.

मराठवाडा परिस्थितीचाही घेतला आढावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठवाड्यातील परिस्थितीचाही आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अहिल्यानगर येथे पावसाचा जोर कायम असल्याने त्यांनी तेथील जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांशी चर्चा केली. नदीजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवून, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि जेवणाचा पुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रसंगी काही अटी शिथिल करून त्यांना राज्य शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीस कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड आणि विविध महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group