मुंबई : (jayhind yatra)भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्याकरिता मुंबई काँग्रेसच्या वतीने आज जय हिंद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय सशस्त्र दलांच्या निर्णायक कृतीचे जोरदार समर्थन केले. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी वीर जवानांच्या अटळ समर्पणाचा सन्मान करत, काँग्रेस आपल्या निर्भय सशस्त्र दलांसोबत एकजूट आहे, हा संदेश देण्यात आला.
मोठ्या प्रमामात काँग्रेस नेत्यांची उपस्थिती jayhind yatra

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खेरवाडी जंक्शन वांद्रे पूर्व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय अशी जयहिंद यात्रा काढण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, उपाध्यक्ष अशोक सूत्राळे, अजंता यादव, जिल्हा अध्यक्ष क्लाइव्ह डायस, रवी बावकर, रॉय मणी, महासचिव अवनिश सिंग, किशोर सिंग, कचरू यादव, सुभाष भालेराव, बाळा सरोदे, आसिफ झकेरिया, नीता महाडिक व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते.
“पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना भारतीय सैन्यदल चोख प्रतुत्तर देत आहे. भारतीय सैन्य दलाला मोठा जाज्वल्य व दैदिप्यमान इतिहास आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात भारतीय लष्कराने पाकास्तानला पराभवाची धूळ चारली आहे पण पाकिस्तानच्या कुरापती कमी होत नाहीत. आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि भारतीय सैन्य दल पाकिस्तानला अद्दल घडवेल. देशावर आज आलेल्या संकट प्रसंगी आपण नागरिक म्हणून भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे”, असे आवाहन खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले.