जळगांव : (Jalgaon Crime News) वडिलाच्या मर्जीच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेम विवाह केला होता. वडिलांच्या डोक्यात त्याचा राग होता. हाच राग घेऊन तब्बल एक वर्षानंतर वडिलाने पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथे घडली आहे. ज्यामध्ये मुलीचा मृत्यु झाला असून, जावयी गंभीर जखमी आहे.
पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना
ऑनर किलिंग घटनेत संतप्त लोकांनी गोळीबार (Firing News) करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आरोपी वडील सीआरपीएफ सेवानिवृत्त जवान
या घटनेतील गोळीबार करणारा व्यक्ती सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या एका कार्यक्रमात बेछूट गोळीबार (Firing) केलाय. या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे.
वर्षभरापुर्वी झाले होते लग्न
वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते. आज चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत त्यांनी आपल्या जवळील बंदुकीने गोळ्या झाडल्या. गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.