मुंबई / न्यूयॉर्क : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन लायब्ररी येथील ज्ञानाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. मला तीनवेळा लोकसभा खासदार , राज्य सभा खासदार, महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री, देशाचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मला लोकसेवा करण्याचा अधिकार मिळाला ते केवळ महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळेच अशी कृतज्ञ भावना ना.रामदास आठवले यांनी आज 134 व्या भीमजयंती निमित्त व्यक्त केली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संविधानातील समतावादी भारत साकार करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे असे रामदास आठवले म्हणाले.
जेंव्हा जेंव्हा मी अमेरिकेत येतो तेंव्हा तेंव्हा लेहमन लायब्ररीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यास मी येत असतो. लेहमन लायब्ररी मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे जागतिक स्मारक स्थळ असून आमच्या साठी प्रेरणादायी स्थळ आहे असे रामदास आठवले म्हणाले.
कोलंबिया विद्यापीठात लेहमन लायब्ररी मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाले त्या सोहळ्यास मी डॉ.माईसाहेब आंबेडकर यांच्या समवेत उपस्थित होतो अशी आठवण रामदास आठवले यांनी सांगितली.