आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन 

Share

मुंबई : आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. 

सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे.

कोण होते सुधाकर पठारे? 

सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील होते. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अ‍ॅग्री, एलएलबी झाले आहे. 

स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली

अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत. सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यावर शोककळा पसरली आहे.

 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group