मुंबई : (Gram Panchayat Diwankhed) अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील दिवाणखेड ग्रामपंचायतीने अत्यंत अभिनव उपक्रम आपल्या ग्रामपंचायती मध्ये राबवून नावारूपाला आली आहे. 100 टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्यांना थेट प्रोत्साहन बक्षीस योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग तिवसा तालुक्यात झाला असून, स्थानिक नागरिकांकडूनही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
दिवानखेडा ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम (Gram Panchayat Diwankhed)
यानिमित्ताने तिवसा पंचायत समितीने दिवाणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सर्व प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत थकीत आणि नियमित कर भरणाऱ्यांकरीत लकी ड्रॉ च्या स्वरूपात नावीन्यपूर्ण बक्षीस योजना राबविण्यात आली. यामध्ये 7 बक्षीसे व प्रत्तेक 100 टक्के ग्रामपंचायत कर भरणा करणाऱ्या करदात्याला कचरा कुंडीचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जबरदस्ती अथवा जप्तीच्या मार्गाने थकीत कर वसूली करण्याएवजी एका वेगळ्या उपक्रमाचा उपयोग करून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ग्रामपंचयातीच्या अशा एका अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
करदात्यांचा चांगला प्रतिसाद असल्यास दरवर्षी काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा ग्रामपंचयातीचा दृष्टीकोण असल्याचे या ठिकाणी यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, विस्तार अधिकारी पांडुरंगजी उलेमाले यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणखेडचे सरपंच बाळूभ ऊड़के दिवानखेड, उपसरपंच प्रवीण खताळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी अनुष आमले कार्यक्रमास उपस्थित होते.