forest officer; वनाधिकारी महिलेच्या बडतर्फ पतीची दबंगगिरी नडणार

Share

सरकारी वाहनाच्या दुरुपयोग तसेच वनमजूराच्या छळवणूकीप्रकरणी वनमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नेत्वा धुरी

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी-पाटील यांचे पती व कृषी विभागातील बडतर्फ अधिकारी पवन पाटील यांनी पत्नीची सरकारी गाडी वापरुन उद्यानाबाहेर केलेल्या मारहाणीची दखल वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली आहे. पाटील यांच्या घरी नियमबाह्यपणे घरकाम करणा-या वनमजूराची छळवणूक केल्याचे प्रकरणही आता रेवती कुलकर्णी यांच्या अंगलट आले आहे. या दोन्ही प्रकरणात चौकशी केली जाईल, तथ्य आढळल्यास  योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी महालक्षवेधीशी बोलताना दिली.  

नेमकी घटना काय ? forest officer

७ जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी-पाटील यांचे पती पवन पाटील यांनी उद्यानाबाहेरील लॉण्ड्रीच्या दुकानात जाण्यासाठी पत्नीची सरकारी गाडी वापरली. मोहन क्रिश ड्राय क्लिनर्स दुकानात जाऊन त्यांनी स्वतःजवळ बाळगलेल्या कपड्यांबाबत विचारणा करत दोन दुकानदारांना मारहाण केली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. पवन पाटील यांनी उद्यानात आल्यापासून घरकामासाठी आलेल्या वनमजूराला खासगी वाहन धुण्यासाठी शाब्दिक शिवीगाळ करत असल्याचेही प्रकरण उघडकीस आले. ही घटना गेल्या वर्षी घडली होती. वनमजूराने उद्यान प्रशासनाला पवन पाटील यांच्याविरोधात लेखी तक्रारही केली होती. वर्ष उलटले तरीही उद्यान प्रशासनाने पाटील यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. दोन्ही घटना महालक्षवेधीकडून उघडकीस आल्यानंतर उद्यानाच्या संचालिका आणि मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांनी विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याची माहिती दिली. मात्र अद्यापही रेवती कुलकर्णी पाटील यांनी कोणतेही लेखी स्पष्टीकरण दिले नसल्याचे समजले.

वनमजूराला घरकामास नियुक्त करणे नियमबाह्य

याबाबत महसूल व वनविभागाने ३१ जानेवारी २०१५ रोजी सरकारी अध्यादेश जारी केला होता. वनमजूरांना खासगी व अशासकीय कामे देऊ नयेत. एखाद्या अधिका-याने वनमजूरांना शासकीय कामाव्यतिरिक्त इतर कामे दिल्यास सरकारकडून गंभीर दखल घेतली जाईल. 

सीसीटीव्ही कॅमे-यातील सरकारी वाहनाचा नंबर मिळताजुळता 

विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी-पाटील यांना उद्यान प्रशासनाने एमएच४७बीएफ८६७२ ही सरकारी गाडी दिली आहे.  सीसीटीव्ही कॅमे-यात गाडीचा क्रमांक रेवती कुलकर्णी-पाटील यांच्या वाहनाशी जुळत आहे. 

माहिती देण्यास विभागीय वनाधिकारी महिला अधिका-याचा नकार

संपूर्ण वाद उद्भवल्यानंतर तसेच वरिष्ठांकडून लेखी स्पष्टीकरण देण्याची सूचना आल्यानंतरही विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांनी त्यांची बाजू सांगण्यास टाळाटाळ केली. त्यांना फोन तसेच मॅसेजवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group