पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच करायला हवी. प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला आणि दैनदिन वापरात सिंगल युज प्लास्टिक चा वापर करणे टाळले,नैसर्गिक संसाधनाचा कमीत कमी वापर केला,विजेचा अतिरिक्त वापर टाळला , पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले , तर रहिवासी संकुलानी सांडपाण्याचा पुन:र्वापर सोसायटीतील झाडांसाठी केला तर आपल्या प्रत्येक नागरिकाची भूमिका पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावेल असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी नेपियन्सी रोड वरील प्रियदर्शनी पार्क येथे आज केले.
दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेच्या वतीने आज नागरिकांशी संवाद यात्रेचे आयोजन आज प्रियदर्शनी पार्क येथे करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमाला राज्यसभा खासदार मिलिंद देवरा आणि दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात वरळी, कफ परेड, शिवडी, कुलाबा, मलबार हिल, पेडर रोड येथे रहिवासी संघटनेचे अनेक नागरिक उपस्थित होते.
या संवाद कार्यक्रमात मुंबई मधील हवा प्रदूषण, सांडपाणी शुद्धीकरण, घनकचरा, प्लास्टिक कचरा, कोस्टल रोड च्या सभोवती प्रस्तावित असलेले उद्यान अशा पर्यावरण विषयक विविध प्रश्न बाबत नागरिकांनी सिद्धेश कदम यांच्याशी संवाद साधला. मुंबईतील हवा प्रदुषणासाठी बांधकाम चालू असलेल्या इमारतींनी हवा प्रदूषण होवू नये म्हणून घ्यावयाची दक्षता, रेडी मिक्स प्लांटला अच्छादन करणे बंधनकारक केले असून रेडी मिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे यांत्रिक पद्धतीने प्लांटच्या ठिकाणी ये जा करताना वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबींसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला यापूर्वीच निर्देश दिले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे असे त्यांनी सांगितले.
त्याच बरोबर महानगर पालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेची प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी पाहणी केली असता ते काम प्रगतीपथावर असून ते वेळेत पूर्ण होण्यासाठी मी पाठपुरावा करीत आहे असे उपस्थित नागरिकांना सिद्धेश कदम यांनी सांगितले.
मुंबई शहरातील हवेचे प्रदूषण विहित मर्यादेत ठेवण्यासाठी इमारती बांधकाम क्षेत्रासाठी काही नियोजन करता येईल का, त्याच बरोबर दिवसातील काही कालावधीसाठी नो व्हेईकल झोन असे काही करता येवू शकेल का याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिद्धेश कदम यांनी व्यक्त केले. नागरिकांशी पर्यावरण प्रश्नांबाबत संवाद यात्रचे आयोजन मुंबई शहरात प्रथमच करण्यात आले होते.
या संवाद यात्रेला उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषण नियंत्रणाबाबत करत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती यावेळी सिद्धेश कदम यांनी दिली आणि नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. या संवाद यात्रेचे आयोजन करण्यामागे दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेच्या सचिव सुशीबेन शहा यांनी पुढाकार घेतला होतो . यानंतरही लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर अशा संवाद यात्रेचे आयोजन भविष्यात करण्यात येईल अशी ग्वाही दक्षिण मुंबई रहिवासी संघटनेच्या वतीने नागरिकांना देण्यात आली.