नवी मुंबई: Environment-friendly Ganeshotsav competition गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा एक मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यामुळे, त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेने ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा २०२५-२६’ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश गणेशोत्सव मंडळांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रोत्साहित करणे, तसेच समाजामध्ये स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.
सर्वातकृष्ट १० मंडळाची निवड केली जाणार Environment-friendly Ganeshotsav competition
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, मंडळांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. मंडळांनी धर्मदाय आयुक्त आणि स्थानिक पोलीस यांच्याकडे नोंदणी केलेली असावी, तसेच महापालिकेची आवश्यक परवानगी घेतलेली असावी. स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांना भेट देण्यासाठी आणि त्यांचे काम तपासण्यासाठी महापालिका परीक्षक नेमणार आहे. मंडळांनी सादर केलेल्या माहिती, व्हिडिओ आणि कागदपत्रांच्या आधारे, सर्वोत्कृष्ट १० मंडळांची निवड केली जाईल.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ७५,००० रुपये, तर दहाव्या क्रमांकासाठी १०,००० रुपयांपर्यंतची बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. या स्पर्धेमुळे गणेशोत्सव मंडळांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी, महापालिकेने दिलेल्या लिंकला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबईतील गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व्हावा, अशी अपेक्षा आहे.