श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले.
पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde)
पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. यातील काही पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यानंतर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठवले होते. या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतः काश्मीरला रवाना झाले. आज श्रीनगर येथे पोहोचताच त्यांनी पर्यटकांची भेट घेतली. यावेळी शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपला हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना अनेक पर्यटकांनी व्यक्त केली.
राज्यातील नागरिकांना सुखरूप परत नेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष विमानांची सोय करण्यात आलेली आहे. त्यातील पहिले विमान आज रात्री रवाना होणार असून त्यातून 65 लोकं मुंबईला परतणार आहेत. तर उद्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अजून तीन विमाने अजून काही पर्यटकांना घेऊन मुंबईकडे झेपावतील असे शिंदे यांनी सांगितले. इथे अडकलेल्या पर्यटकांना भेटून आपण त्याना दिलासा दिला असून सर्वांना सुखरूपपणे आपल्या राज्यात नक्की नेण्यात येईल असेही सांगितले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता चिंता करण्याची काळजी नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.