मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले. मुस्लिमांनी मत दिल्यावर सत्ता जिहाद म्हटले. आता भाजपकडून ईद निमित्त सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशातील ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन कार्यकर्ते भेट देणार आहेत. हा कार्यक्रम सौगात-ए- मोदी नव्हे तर निर्लज्जपणा आहे. बोगस हिंदुत्ववादी आणि बुरसटलेल्या लोकांचा सौगात- ए- सत्ता हेतू आहे. अशा कठोर शब्दांत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली.यादरम्यान, शिवसेनेवर उबाठा वर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करणाऱ्या भाजपने हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवेळी बटेंगे तो कटेंगे चा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चालले आहेत. वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका झाल्या की पुरणपोळी द्यायची, हे यांचे धोरण आहे. हे निर्लज्ज असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात. भाजपाचे ढोंग आता पूरते उघडे पडल्याचे सांगत हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्या उडाण टप्पूला टोप्या घालून सौगात देताना बघायचे आहे, अशी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता ठाकरेंनी खिल्ली उडवली.
भाजपाने हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात, ही लोक तुमचे मंगळसूत्र चोरतील, असे म्हणाले होते. आता हिंदूंचे मंगळसूत्र सुरक्षित आहे का? त्यांच्या मंगळसुत्राचे रक्षण कोण करणार? भाजपा आता हिंदुत्ववादी पक्ष राहिला आहे का? सौगात-ए-सत्ता ही बिहार आणि यूपी निवडणुकीपर्यंतच राहणार की पुढेही राहणार, असे खरमरीत सवाल विचारत भाजपाने एकदा हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. तसेच बिहार मध्ये नितिश कुमार असून याठिकाणी रस्त्यावर नमाज पठण बंद करणार का, असा उलट सवाल ठाकरे यांनी भाजपला केला.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी दंगली घडवल्या का ?
महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला लाडकी बहिण, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अशा थापा मारल्या. मात्र, निव़डणुका होताच, हात वर केले असा आरोप केला. पाशवी बहुमत मिळालेल्या सरकारने राज्य विधिमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात जनतेच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात सुरू आहे. त्यांना हमीभाव मिळत नाही. वनविभागाला न्याय मिळत नाही. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक हत्या घडल्या. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. शांत असलेल्या नागपूरमध्ये दंगल झाली. सत्तेसाठी विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी अशा घटना घडवल्या आहेत का? असा संशय ठाकरेंनी व्यक्त केला.
दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही
कबरीपासून कामरापर्यंत असे हे अधिवेशन झाल्याची खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ठाकरेंनी त्यांचे समर्थन करत, या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा माज दिसल्याचे म्हणाले. विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधाऱ्यांची तक्रार केली. सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते, अशा शब्दांत ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. अधिवेशन काळात विरोधकांना बोलू दिले नाही. त्यामुळे जनतेसमोर बोलण्याची वेळ आली असे ठाकरे म्हणाले. जनता भोळीभाबडी असल्याने त्यांना चिरडून सत्तेत येण्याचा फंडा राबवला जातो आहे. परंतु ही दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही, ती यांना काय जमणार, असे ठाकरेंनी ठणकावले.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकवर पाणी
संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर ते म्हणाले की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. त्याबद्दल एक समिती स्थापन करा. कुत्र्याचे स्मारक रायगडावर ठेवायचे तर ठेवा, उखडायची तर उखडून टाका. त्यावरुन राजकारण पेटवापेटवी करण्याआधी शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल कोणी पेटून का उठत नाही, असा सवाल ठाकरेंनी केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. त्यावेळी मी पण होतो. त्या स्मारकवर पाणी सोडले का? त्या स्मारकाबद्दल हिंदुत्ववादी प्रश्न का विचारत नाहीत, असा खोचक सवाल ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला विचारला.