जिल्हा परिषदेच्या वर्हा सर्कलमध्ये काँग्रेसने उमेदवारी शिरजगाव मोझरीत द्यावी

Share

सर्वपक्षीय बैठकीत गावकऱ्यांचा सुर; सर्व राष्ट्रीयकृत पक्षाकडून शिरजगाव मोझरीत उमेदवारी न देता अन्याय केला जात असल्याची आरोप 

शिरजगाव मोझरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांनी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने शिरजगाव मोझरी गावात उमेदवारी दिली नसल्याने यावेळी खुला प्रवर्गासाठी गावाने प्रबळ दावेदारी ठोकली आहे. शिरजगाव मोझरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे उमेदवारी मागितली असून, त्यासाठी गावातील सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांनी एकमताने गावात उमेदवारी देण्याची मागणी करण्याच्या निश्चय केला आहे. शुक्रवारी गावात पार पडलेल्या बैठकीत गावकऱ्यांनी एकमताचा सुर दिला आहे. 

आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने मोझरी किंवा गुरुदेव नगरात दिलेल्या उमेदवाराचा गेल्या १५ वर्षात पराभवच झाला आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा प्रहारचे उमेदवार संजय देशमुख यांना होत आहे. सलग तीन पंचवार्षिक काँग्रेसचा चुकीचा उमेदवार आणि चुकीच्या राजकीय समीकरणामुळे प्रहारला संधी मिळत आली आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा गौरी देशमुख यांना शिरजगाव मोझरीने १५०० मते प्रहारला दिले होते. तर काँग्रेसला फक्त १७९ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यापूर्वी वर्हा जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जाती राखीव असताना प्रा. चंद्रपाल तुरकाने आणि विनोद हगवणे यांनी काँग्रेसला उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसने दोघांनाही उमेदवारी नाकारून त्यावेळी राष्ट्रवादीतून नुकतेच काँग्रेस प्रवेश झालेले तिवसा शहरातील दिलीप काळबांडे यांना आयात केले होते. परिणामी याची संधी साधून प्रहारने त्यावेळी शिरजगावातील प्रा. चंद्रपाल तुरकाने यांना उमेदवारी दिली होती. त्याचा परिणाम शिरजगाव मोझरी गावाने निपक्ष होऊन संपूर्ण गावाने बहुमत दिले होते.

त्यामुळेच यावेळी शिरजगाव मोझरीतील काँग्रेस नेत्यांसह गावकऱ्यांनी एकमताने यावेळी पुन्हा एकदा गावातीलच उमेदवार जिल्हा परिषदेला उभा करण्याच्या निश्चय केला आहे. कॉंग्रेसने यावेळीतरी गावात उमेदवारी द्यावी  अशी मागणी शिरजगावातील सर्वपक्षीय गावकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शिरजगाव मोझरी गावात चर्जन सभागृहात येथे सर्वपक्षीय गावाची बैठक पार पडली असून, गावातील उमेदवारासाठीच राष्ट्रीयकृत पक्षांनी तिकीट नाकारल्यास अपक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाची उमेदवारी घेऊन प्रस्थापित धनाढ्य उमेदवारांच्या विरुद्ध मैदानात उतरण्याचा तयारी शिरजगाव मोझरीच्या गावकऱ्यांनी दाखवली आहे.

तुरकाने पॅटर्न यावेळी चालणार 

१० वर्षांपूर्वी काँग्रेसने प्रा.चंद्रपाल तुरकाने आणि विनोद हगवणे यांना तिकीट नाकारली होती. तिवसा येथून आयात उमेदवाराला वर्हा सर्कल मध्ये काँग्रेसची उमेदवारी दिली होती. परिणामी शिरजगाव मोझरी गावात  तुरकाने यांना एकमताने बहुमत दिले होते. तर सर्कल मधील सर्व गावांमध्ये बहुमत मिळाले होते. तीच परिस्थिती यावेळी पुन्हा दिसत असून, काँग्रेसने यावेळी सुद्धा शिरजगावात उमेदवारी नाकारल्यास तुरकाने पॅटर्न चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी पंचायत समितीची उमेदवारी मागितली होती. त्यावेळी उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन येन वेळी उमेदवारी रद्द केली. काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी उमेदवारीसाठी शिरजगाव मोझरी दुर्लक्षित आहे. यावेळी तरी काँग्रेसने गावात जिल्हा परिषद उमेदवारी द्यावी . गावात उमेदवारी दिल्यास एकजुटीने काँग्रेसचा विजय करून दाखवू 

– निरंजन कडू, सरपंच, शिरजगाव मोझरी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे वारस शिरजगाव मोझरी आहे. आमच्या गावातील एकोपा आम्ही वेळोवेळी दाखवला आहे. यापूर्वी सुद्धा गावातील उमेदवाराला बहुमतच दिले आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेची उमेदवारी काँग्रेसने शिरजगावात दिल्यास संपूर्ण गाव गावातील उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे. 

– प्रकाश चिचखेडे,गावकरी

गावातील उमेदवार लायक आहे. गावाला यातून नेतृत्व मिळू शकते. काँग्रेसने गावात तिकीट दिल्यास एकमताने गावातील उमेदवाराचा मागे उभे राहणार आहे. उमेदवारी मागण्यासाठी सुद्धा ताकतीने मागणी करणार आहे.

– विजय कुरळकर, सामाजिक कार्यकर्ते

आजपर्यंत गावाला राजकीय नेतृत्व मिळाले नाही. आज गावात पक्षाची उमेदवारी मिळाल्यास पक्षपात न करता एकमताने गावातील उमेदवाराला मतदान करता येईल. त्यामुळे काँग्रेसने यावेळी उमेदवारी देतांना जात-पात न बघता गावात उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा विजय होऊ शकते.

– सुरेश येरणे, अध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ शिरजगाव मोझरी 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group