मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागातील भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला. या मोहिमेतंर्गंत प्रत्येक विभागातील, कारखान्यातील आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात येत आहे. याद्वारे २०२४-२५ आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला ५०७.७८ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.
रेल्वे परिसरातील वापरात नसलेले छप्पर, पडीत खांब, रेल्वे रूळ, मोठ्या-मोठ्या यंत्रणाचे नादुरूस्त भाग भंगारात विक्री केले जातात. भंगार साहित्य पडून राहिल्याने अस्वच्छता पसरते आणि तेथील जागा अडून राहिते. त्यामुळे शून्य भंगार मोहिमेतून भंगार उचलले जात आहे. यामध्ये लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे. यासह मोडीत काढलेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिने, जुने डबे, माल डबे, चाके यांची विक्री केली आहे.
एवढी झाली कमाई
या विक्रीमधून पश्चिम रेल्वेने २१ मार्च २०२५ रोजी भंगार विक्रीत ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत एकूण भंगार विक्रीतून ५०७.७८ कोटी रुपये असून रेल्वे मंडळाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा २७ टक्के जास्त आहे. यासह, पश्चिम रेल्वेने उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे आणि पूर्व रेल्वेसह भंगार विक्रीसाठी ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये देखील सामील झाले आहे.