दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट

Share

आदित्य ठाकरेनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सतीश सालियन यांच्या तक्रारीवर लवकरच एफआयआर नोंदवण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत, लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निरुपम म्हणाले की, नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली आहे. या तक्रारीत उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती निरुपम यांनी दिली दिशा सालियनची ८ जून २०२० मध्ये हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियनची हत्या संशयास्पद झाली होती. या दिवशी दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण उपस्थित होते, अशी चर्चा त्या दिवशी झाली होती, असे निरुपम म्हणाले.

राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आली. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे निरुपम म्हणाले.

सरकार विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आदित्य ठाकरे यांचा आरोप खोटा आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. आदित्य यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर देखील कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले. या प्रकरणी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि इतरांवर संशय आहे. हे सर्व ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरे ड्रग्ज घेतो, असे समीर खानने चौकशीत म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पोलीस कटिबद्ध असल्याचे निरुपम म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उबाठा गटाने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group