परळी: (Beed Congress) महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे या हेतूने प्रदेश काँग्रेसने राज्यात सद्भाव वाढीस जावा व महाराष्ट्र धर्म वाचावा यासाठी परळीत सद्भावना सत्याग्रह आयोजित केला होता, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
परळीत सद्भावना सत्याग्रहाचे आयोजन (Beed Congress)
परळीतील गांधी स्मृती स्तंभ येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना सत्याग्रह करण्यात आला. त्यापूर्वी सकाळी त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराज व महानाव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, युवा नेते आदित्य पाटील, प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे परळी शहर अध्यक्ष बहादूर भाई, ॲड प्रकाश मुंडे, शिवाजीराव देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व परळीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात महाराष्ट्र धर्मावर होणारे आक्रमण हा चिंतेचा व गंभीर प्रकार आहे. हे आक्रमण थोपवून महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज आहे. आपल्याकडे सद्भावना कमी होत चालली आहे. संतोष देशमुखांसारख्या सरपंचाची निघृण हत्या करण्यात आली. आपल्याच जातीच्या माणसाकडून दुकानातून माल खरेदी करा असे सांगितले जाते, हे विदारक चित्र वाढीस लागले आहे हे दुर्दैवी आहे. राज्यातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेसने सद्भावना वृद्धींगत व्हावी यासाठी सद्भावना यात्रा सुरु केली आहे. पहिली पदयात्रा मस्साजोग ते बीड अशी काढण्यात आली. यात्रेला सुरुवात करण्याआधी भगवानबाबा व नगद नारायणालाही साकडे घातले होते आणि आज सद्भावना सत्याग्रह करण्याआधी परळीच्या वैद्यनाथालाही साकडे घातले. महादेवाने जे अव्दैत दिले म्हणजे सद्भानेचा मंत्र दिला त्यांच्याच गावात सद्भावनेचा जागर घातला. आता राज्यातील प्रत्येक नागरिकांने सद्भावनेचा मंत्र जोपासला पाहिजे असे आवाहन सपकाळ यांनी केले.
भाजपा युती सरकारने 100 दिवसात आका, खोके शब्द दिले
महायुती सरकारचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड सरकारने जाहीर करून गवगवा केला पण भाजपा युती सरकारच्या 100 दिवसात राज्याला काय मिळाले तर आका, खोके हे शब्द मिळाले आणि दुर्दैवाने हे दोन्ही शब्द बीड जिल्ह्यातून राज्याला मिळाले. राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत, शेतमाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिलेल्या सरकारने आता आम्ही असा शब्द दिलाच नाही असा पवित्रा घेतला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे तर लांबच राहिले 1500 रुपयेही दिले जात नाहीत. भाजपा युतीने निवडणुकीवेळी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. अवघ्या 100 दिवसात भाजपा युतीने जनतेची घोस फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
4-5 मे रोजी परभणीत काँग्रेसची सद्भावना यात्रा
सद्भावना यात्रेच्या पुढील टप्प्यात म्हणजे उद्या दिनांक 4 मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा आयोजित करण्यात आली आहे तर 5 मे रोजी परभणीतच संविधान बचाव यात्रा आयोजित केली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.