आरटीओचे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेची ‘ईओडब्ल्यू’ चौकशी होणार

Share

मुंबई : परिवहन विभागातला एक सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे बदली संदर्भातील गैरव्यवहार व आरटीओच्या कामात हस्तक्षेप करतो. अधिकाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून वेठीस धरून शासनाविरोधात काम करण्यास प्रवृत्त करतो. त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देऊनही कारवाई होत नाही. त्याला अटक करण्याबाबत शासन काय करणार आणि या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखे (ईओडब्ल्यू) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी बुधवारी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली.

दरेकर म्हणाले कि, आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. परिवहन विभागातील बजरंग खरमाटे सेवानिवृत्त अधिकारी आहे. परिवहन विभागातील बदली, गैरव्यवहार प्रकरणात नागपूर पोलीस आयुक्तांनी २५ जानेवारी २०२४ ला शासनाला अहवाल सादर केला. या अहवालात हा अधिकारी बदली संदर्भातील गैरव्यवहार आणि आरटीओ कामकाजात हस्तक्षेप करतो असे नमूद केले आहे. गृहविभागाने ५ फेब्रुवारी २०२४ ला खरमाटे विरोधात फौजदारी कारवाई करण्याबाबत परिवहन विभागास कळवलेय. मात्र अजूनही परिवहन विभाग खरमाटेवर कारवाई करू शकला नाही.

खरमाटे संबंधित खासगी व्यक्तीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची भीती दाखवून विभागातील अधिकाऱ्यांना वेठीस धरून आर्थिक वसुली करतोय. अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावून शासनाविरोधात गैरकाम करण्यास प्रवृत्तही करतो. खरमाटे विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देऊनही कारवाई का होत नाही? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला.

यावेळी दरेकर यांनी भरत लांगे याने परिवहन आयुक्तांना लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखवले. तसेच आर.आर. रोडवेज प्रा. लिमिटेड, कळंबोली, नवीमुंबई येथील हरिकुमार शर्मा नावाचा खरमाटेचा कलेक्टर आहे. कॉल रेकॉर्ड, सीडीआर तपासा, खंडणीचे महाभयंकर कांड समोर येईल. याबाबतचा अहवाल पाहावा, खरमाटेला अटक करण्यासंदर्भात शासन काय करणार ? तसेच ईओडब्लूकडे याची चौकशी देण्याबाबत भूमिका जाहीर करावी, अशी विनंतीही दरेकरांनी केली.

दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, बजरंग खरमाटे याच्या विरोधात ज्या चौकशा आहेत त्या केल्या जातील. आर्थिक गुन्हे असल्याने ईओडब्ल्यूमार्फत चौकशी केली जाईल. परिवहन विभागात जे गैरप्रकार सुरू आहेत ते थांबवले जातील.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group