नेत्वा धुरी
मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बच्चेकंपनीच्या आवडत्या वनराणी (मिनीट्रेन)च्या आगमनाला चोरीचे गालबोट लागले आहे. उद्यानातील पाड्यातील लोकांनी ट्रॅकमार्गातील साहित्य चोरल्याने मिनीट्रेनचा मार्ग धोकादायक ठरला आहे. साहित्य चोरल्याने मिनी ट्रेन रुळावरुन घसरण्याची भीती असल्याने या प्रकरणी एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली असून, गेल्या आठवड्याभरापासून उद्यान प्रशासन संपूर्ण ट्रॅकमार्गाची तपासणी करत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून उद्यानातील मिनी ट्रेन बंद आहे. जुनी नादुरुस्त मिनीट्रेन बाजूला सारत यंदाच्या वर्षी उद्यानात नवी मिनी ट्रेन दाखल झाली. नव्या पर्यावरणपूरक मिनीट्रेनला जुलै महिन्यात रुळावर उतरवण्यात आले. पावसाळा संपेपर्यंत सराव तपासणी करण्यात आली. यंदाच्या दिवाळीत वनराणी सुरु करण्याचा उद्यान प्रशासनाचा मानस होता.
ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात ट्रॅकवरील साहित्य चोरीला गेल्याचे मिनीट्रेनचे काम पाहणा-या ंकंत्राटदार कंपनीला आढळले. या प्रकरणी संबंधित कंपनीने उद्यान प्रशासनाच्या वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील तसेच विभागीय वनाधिकारी (दक्षिण) किरण पाटील यांना तक्रार केली. काही साहित्य संवेदनशील असल्याने वनराणीचा मार्गक्रमण धोक्यात असल्याची चिंता या तक्रारपत्रात व्यक्त करण्यात आली. ट्रॅकमार्गावरील साहित्याची कमतरता राहिल्यास वनराणीचे चाक रुळावरुन घसरण्याची भीतीही नमूद करण्यात आली. हे चोरीप्रकरण मिनी ट्रेन परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले. या प्रकरणानंतर उद्यान प्रशासनाने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी उद्यानाच्या वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रुळावरील पाच किलोच्या सामानाची चोरी झाली आहे. खिळे, क्लिप्स आदी सामान नजीकच्या पाड्यातील लोकांनी चोरले. आम्ही पोलिस तक्रार केली असून, एकाला अटक झाली आहे. अजूनही मिनी ट्रेनचे कामकाज पाहणा-या कंपनीने आणि कंत्राटराकाडून आमच्याकडे मिनीट्रेनचे हस्तांतरण झालेले नाही. या प्रक्रियेपर्यंत मिनीट्रेनच्या व्यवस्थापनात आमची जबाबदारी येत नाही. ही जबाबदारी संबंधित कंपनीची येते. सुरक्षिततेकरिता त्यांनी आमची मदत घ्यायला हवी होती. सुरक्षिततेच्या उपायांखातर संपूर्ण काळजी घेतली जात आहे. – किरण पाटील, विभागीय वनाधिकारी (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.
