Jansuraksha
मुंबई ः (Jansuraksha) जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती मुंबईत स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याशिवाय त्यांचे मित्र पक्ष असलेल्या इतर पक्षांच्याही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या सहभाग असून, मंगळवारी राज्यभर व मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा दिला आहे.
जनसुरक्षेच्या नावावर जनतेच्या हक्कावर घाला (Jansuraksha)
शहरी नक्षलवाद्याच्या नावाखाली भाजपा युती सरकार जनसुरक्षा कायदा आणत असून अन्यायाविरोधात आवाज उठवणाच्या जनतेच्या हक्कावर घाला घालण्याचे काम या कायद्याने केले जाणार आहे. संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी कायदे आहेत त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याची देशाला व महाराष्ट्राला गरच नाही. त्यामुळे हा जुलमी कायदा रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, शिवसेना उबठाचे नेते सचिन आहीर, एडवोकेट. राजेंद्र कोर्डे किसान मजदूर पार्टी, कॉ. प्रकाश रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, कॉ. शैलेंद्र कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राहुल गायकवाड, फॉरवर्ड ब्लॉकचे किशोर कार्दक आदी उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या विधेयकात एखादी संस्था वा एखादे कृत बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे, त्यामुळे सरकार उद्या कोणालाही बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारावई करेल. एखाद्या व्यक्तीची कृती वा संस्था सरकारने बेकायदेशीर ठरवली की त्यांना अनेक वर्ष तुरुंगात डांबून ठेवले जाईल व लाखो रुपयांचा दंडही केला जाईल. हे जनतेच्या हक्कावर गदा आणणारे असून त्याला काँग्रेस व समविचारी पक्षांचा विरोध आहे.
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकपा, भाकपा, शेकाप, सीपीआयएमएल (लिबरेशन), लाल निशाण पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांनी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती गठीत केली असून या समितीच्या वतीने मंगळवारी (ता.२२) रोजी मुंबईसह राज्यभर मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबईत दुपारी तीन वाजता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बांद्रा पूर्व येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यात मुंबई काँग्रेस सहभागी होणार असल्याचे खासदार गायकवाड यांनी सांगितले.