मुंबई : (Ambedkarjayanti) अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी केली गेली. या जयंती कार्यक्रमात अमेरिकन तत्वज्ञ डॉ. कॉर्नल वेस्ट यांनी कार्यक्रमाचे बीजभाषण केले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बिश्नू पेरियार, बोस्टन विद्यापीठाचे पीएच. डी. स्कॉलर दादासाहेब तांडले, राम गौतम, कॅप्टन विजय बांबोळे, डॉ. सलाम शेख, ॲड. दीपक चटप, इशान परमार यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती.
अमरावतीच्या विकास तातड यांचा सन्मान (Ambedkarjayanti)
कोलंबिया विद्यापीठात लेहमन ग्रंथालयात हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात विकास तातड यांना न्यू जर्सी महापौर यांचे प्रॉक्लेमेशन देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आई-वडिलांसह हा बहुमान स्वीकारला. या जयंती कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारांना उजाळा मिळाला.
तातड यांनी विविध माध्यमातून आपला संघर्ष मांडला
कार्यक्रमाची सुरवात त्रिशरण व पंचशीलाने करण्यात आली. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संस्कृतीक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे आपल्या खास शैलीतून संविधानिक मूल्यांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. विपीन तातड यांच्या रॅपने कार्यक्रमाला रंगत आली. नवीन कुमार यांच्या कविता लक्षवेधी ठरल्या. मुख्य संयोजक विकास तातड यांनी प्रास्ताविक केले. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जयंती आयोजनाचा इतिहास आणि विद्यार्थ्यांना सोसावा लागणारा जाती आधारित भेदभाव संरक्षित कॅटेगरी म्हणून समावेश करून घेताना करावा लागलेला संघर्ष मांडला.
विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून कोलंबिया विद्यापीठात सातत्याने जयंती साजरी केली जात असून या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेनदिवस वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रमुख वक्ते डॉ. सलाम शेख यांनी त्यांचे पूर्वज भारतात बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी होते. बाबासाहेबांचा विचार अमेरिकेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहिचविण्यासाठी कार्यरत राहील असे नमूद केले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी एक शाळा सुरु केली असून तिथे देखील बाबासाहेबांची जयंती साजरी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.