मुंबई : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ – महाराष्ट्र प्रांताच्या शिष्टमंडळाने वेणुगोपालजी रेड्डी, प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांची मंत्रालयात भेट घेऊन, महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर देखील उपस्थित होते. महासंघाचे राष्ट्रीय सचिव (उच्च शिक्षण) व महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर यांच्या यांनी महासंघाचे प्रतिनिधित्व करत विस्तृत निवेदन मांडले.
राज्यभरातील विविध समस्यांनी ग्रस्त प्राध्यापकांच्या समस्या आणि त्यावर अपेक्षित समाधान या विषयी शैक्षिक महासंघाने अनेक बैठकांचे आणि चर्चासत्रांचे आयोजन केले. शेकडो प्राध्यापक अडकून असलेल्या मोठ्या समस्यांपासून ते व्यक्तिगत स्वरूपांच्या समस्या देखील या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या. पारंपारिक, व्यावसायिक, समाजकार्य, क्रीडा व खेळ, ग्रंथालय, संगीत, अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्राध्यापक, प्राचार्य, महाविद्यालये, संस्थाचालक यांच्या समस्या मांडण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी विस्तृत स्वरूपाचे तब्बल 17 मागण्यांचे निवेदन आणि 8 महत्वपूर्ण मागण्यावर प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी वेळेचे बंधन न पाळता शिष्टमंडळाशी प्रदीर्घ चर्चा केली.
या आठ मुख्य मागण्यांवर दाखवली सकारात्मकता
- सहयोगी प्राध्यापक पदासाठी पीएच.डी. अट शिथिल करण्याची अंमलबजावणी
- एम.फिल. पात्रता धारकांना सेवा लाभ देणे.
- जुनी पेन्शन योजना लागू करणे
- 2016 ते 2019 दरम्यान पीएच.डी./एम.फिल. साठी प्रोत्साहनपर वेतनवाढ देणे.
- शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल यांच्यावरील अन्याय.
- प्राचार्यांना प्राध्यापक पदावरील (AL-14) लाभ देणे.
- महात्मा फुले महाविद्यालय पातुर समायोजन प्रकरण.
- ‘अधिष्ठाता’ पदावरील आरक्षण लागू न करणे.