मुंबई : कोरोना नंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला व या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात या समितीने अहवाल सादर करावा असे निर्देश ही त्यांनी विभागाला दिले आहेत.
तमाशा कलावंत व कला केंद्राच्या शिष्टमंडळांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात ॲड आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडले होते. आज लोकनाट्य कलाकार व कला केंद्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा करुन त्यांचे म्हणणे मंत्री शेलार यांनी ऐकून घेतले.
कोरोना नंतर तमाशा कलावंताना रोजगाराच्या अनेक संधी गमावाव्या लागत आहेत. तसेच काही कलावंत हे या क्षेत्रातून अन्य क्षेत्राकडे वळले त्यामुळे ढोलकी वादकांपासून विविध कला कौशल्य असलेले कलाकार आज मिळत नाही अशी अडचण निर्माण झाल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच कला केंद्र चालवताना असंख्य अडचणी असून भविष्यात कला केंद्र व ही कला टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. तसेच तमाशा सादरीकरणातही अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर होऊ लागला असून पारंपरिक तमाशा आणि आजचा तमाशा यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत. यामुळे एकिकडे तमाशा कलावंत, कला केंद्र चालक यांच्या समोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत तसेच दुसरीकडे ही कला पारंपरिक दृष्टीने टिकून ठेवणे सुध्दा महत्त्वाचे असल्याने याबाबतही या सगळ्या कलावंत व त्यांच्या संघटनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.