मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
गावतळी, शेततळी, तलाव, बंधारे यांचं उत्खनन करताना निघणारी खडी, माती, मुरूम आता शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांच्या कामासाठी वापरता येणार आहे. त्यासाठी सरकारकडून कुठलही रॉयल्टी आकारली जाणार नाही. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील पाणंद रस्त्यांच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. आता या रस्त्यांसाठी लागणारी सामग्री रॉयल्टी फ्री करण्याचा निर्णय घेतल्यानं पाणंद रस्त्यांच्या कामाला गती मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.