म्यानमार, थायलंड हादरले! भूकंपामुळे ७०० जणांचा बळी, जखमींची संख्या १,६०० च्या पुढे

Share

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेलं भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार हे सध्या गृहयुद्धात अडकलं आहे. त्यातच म्यानमारवासियांवर शुक्रवारी आणखी एक संकट कोसळलं. म्यानमार व शेजारच्या थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर, जखमींची संख्या १,६७० च्या पुढे गेल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. या भूकंपामुळे ३० लाख नागरिक विस्थापित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात धक्के बसले, त्यापैकी ७.७ (रिष्टर स्केल) तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का होता. भूकंपानंतर म्यानमार व थायलंडमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून ठिकठिकाणी बचाव मोहिमा चालू आहेत. दुभंगलेले रस्ते, उघडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे. म्यानमारमधील लष्करशाहीने भूकंपानंतर सहा प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप १० किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपानंतर ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. या भूकंपानंतर म्यानमार व थायलंडने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान, म्यानमारला लागून असलेल्या चीनच्या नैऋत्य युनान प्रांतातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. मात्र, तिथे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मालमत्तेचं काही नुकसान झालं आहे का याची चौकशी केली जात आहे.

पाच देशांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

या भूकंपाची तीव्रता इतकी होती की म्यानमारच्या शेजारील राष्ट्रांमध्ये (सीमा भागात) धक्के जाणवले. बांगलादेश, लाओस, चीन व भारतातही हे धक्के जाणवले. भारतात मणिपूर व पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने भारतात या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्यानमार व थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मोदी म्हणाले, “अडचणीच्या प्रसंगी भारत या दोन्ही देशांच्या बरोबर उभा आहे. दोन्ही देशांना लागेल ती मदत करण्यास भारत तयार आहे.” पाठोपाठ भारताने म्यानमार व थायलंडला मदत पाठवली आहे.

म्यानमारच्या सागाइंगपासून १६ किलोमीटर उत्तर-पश्चिमेकडे ७.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचं केंद्र २२.०१ उत्तर अक्षांश आणि ९५.९२ अंशावर होतं.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group